ठाकरेंनी प्रवेश दिला पण उमेदवारी जाहीर का नाही? काँग्रेसने मतदार संघावर दावा का केला नाही ?
भाजपकडे सर्व उमेदवारांचे सर्वे पण नावांची निश्चिती का नाही ?
शिवराज काटकर / विश्लेषण
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत प्रवेश दिला. लोकसभेचे संघटक म्हणून जाहीर केले पण थेट उमेदवारी का जाहीर केली नाही? भारतीय जनता पक्षाकडे सर्वांचे सर्वे आहेत तरीही ते उमेदवाराचे नाव निश्चित का सांगत नाहीत? काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे पण राज्यस्तरावरील काँग्रेस नेत्यांनी मतदारसंघ का सोडवून घेतला नाही? हे काही प्रश्न आहेत ज्यामुळे सांगलीची लढत नेमकी कशी होईल त्याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.
सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र 2014 मध्ये तो ढासळला आणि 2019 मध्ये तर काँग्रेसने या मतदार संघावरचा हक्कच सोडला. आताही तो हातून सुटल्याचे सांगितले जात आहे. मात्र काँग्रेस नेत्यांनी आग्रह सोडलेला नाही. त्यांना अजूनही आशा आहे. ही आशा कशावर टिकून राहिली आहे? या प्रश्नांचे कोडे मतदार संघाला पडलेले आहे.
ताज्या घडामोडी मध्ये चंद्रहार पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करून मातोश्री गाठले आणि ठाकरेंनी त्यांच्या हाती गदा सोपवली. त्यांना लोकसभेवर पाठवू असे स्पष्ट संकेत दिले पण पक्षाची उमेदवारी जाहीर केली नाही. याला काही कारणे आहेत. अमोल कीर्तिकर यांची मुंबईतून लोकसभेला उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढली होती. आधीच उमेदवारी कशी जाहीर केली? असा प्रश्न विचारला गेला. त्याच पद्धतीने बारामतीत सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार असे सांगितले गेल्यानंतरही आक्षेप घेतला गेला. परिणामी यापुढे आपल्या हककांच्या मतदार संघाचे दौरे करायचे मात्र उमेदवारी यादी एकत्र जाहीर करायची. काही ठिकाणी एकमेकाचे बळकट उमेदवार मित्रपक्षाला देऊ करायचे आणि विजयी होण्याची क्षमता असलेला उमेदवार ज्याच्याकडे असेल त्याला मतदार संघ सोडायचा यावर महाविकास आघाडीचे एकमत झालेले आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय होऊनही काही नावे जाहीर करणे शक्य असताना झालेली नाहीत. सांगली सारख्या मतदार संघावर काँग्रेस ठाम दावा करते कारण गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेले विशाल पाटील त्यांच्याकडे उमेदवार म्हणून उपलब्ध आहेत. मात्र कोल्हापूरच्या ठाकरे यांच्या पक्षाच्या गतवेळी निवडून आलेल्या खासदारकीच्या दोन्ही जागा यावेळी तडजोडीत शाहू महाराज आणि राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यासाठी ठाकरे यांनी सांगली शिवसेनेला सोडावा, तो आधीच काँग्रेसने सोडलेला असून स्वाभिमानी तेथे दावेदार नाही त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील हा एकमेव मतदार संघ हवाच असा दबाव त्यांनी ठेवला आणि त्यासाठी आपल्याकडे तगडा उमेदवार आहे हे सिद्ध करण्यासाठी चंद्रहार पाटील यांना प्रवेश दिला.
सांगली विधानसभेत पराभवाचा परिणाम?
चंद्रहार यांना उमेदवारी मिळणार तर काँग्रेस कार्यकर्ते बंडाची भाषा करत आहेत. मात्र काँग्रेस नेतृत्वाने त्याबाबत काही भूमिका घेतलेली नाही. मुळात सांगली विधानसभा मतदार संघात पृथ्वीराज पाटील पराभूत झाल्याचे काही परिणाम यावेळी सांगली बाबत मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी आग्रह न धरण्यात झाल्याची चर्चा आहे. नाना पटोले तर तसे उघड बोलून गेले आहेत. तरीही ठाकरेंशी अंतिम चर्चेत तोडगा काढू असे नेते सांगत असल्याने स्थानिक आशावादी आहेत. त्यांना राजू शेट्टी आघाडीत येणार नसल्याने सेनेला हातकणंगले हा आणखी एक मतदार संघ रिकामा असल्याने सांगली नेते सोडवून घेतील असे वाटत आहे. ठाकरेंनी आपण सांगली मतदार संघ लढविण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले असून हा एकच मतदार संघ आणि त्यांच्याकडे क्रेझ असलेल्या मल्ल उमेदवार असल्याने चंद्रहार पाटील यांच्यासाठी ते सभा आणि दौरा करण्याचीही शक्यता आहे.मात्र जोपर्यंत महाविकास आघाडीचे एकत्र उमेदवार किंवा सुटलेले मतदार संघ जाहीर होत नाहीत तोपर्यंत ना काँग्रेसला ना शिवसेनेला ठामपणे आपणच मतदारसंघ लढवत आहोत हे सांगता येणार नाही.
भाजपमध्ये दोघात टसल
भाजपमध्ये सध्या खासदार संजय काका पाटील यांना तिकीट मिळणार की माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना मिळणार यावर मतमतांतर आहे. बहुसंख्य पदाधिकाऱ्यांना काका नको आहेत आणि उमेदवार बदलला जाणार हे ते सांगत आहेत. तर बदल होणार नाही असाही दावा होतोय.
काकांना महादेव पावला अन् बाबांना निरोप मिळाला....
काकांचे कार्यकर्ते मात्र काकांना महाशिवरात्रीला महादेव पावला असल्याचे सांगत आहेत. तर बाबांचे कार्यकर्ते बाबांना दिल्लीला बोलावून तयारीला लागण्याचा निरोप मिळाल्याचे सांगत आहेत. काही पदाधिकारी इतर पक्षातील युवा नेत्यांची नावे सांगत आहेत. सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय लावण्याचा अधिकार देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दोन्ही इच्छुकांकडून शब्द सोडवून घेऊन आपली पसंती कळवायची आहे. सांगलीतही सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी आम्ही पक्ष देईल तो उमेदवार विजयी करू असा शब्द सोडवून घेतला आहे. अर्थात हे सगळे प्रत्येकाचा स्वतःचा अजेंडा ठरलेला आहे. मतदार संघ आणि उमेदवारीचा निकाल लागल्यानंतर इच्छुक सुद्धा आपापली भूमिका उघड करताना दिसतील.