For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठाण्यात उद्धवसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

08:35 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ठाण्यात उद्धवसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या  हल्लेखोर फरार
Advertisement

ठाणे : ठाण्यातील मनोरमानगर परिसरात उद्धवसेनेचे शाखाप्रमुख प्रदीप पूर्णेकर (४७) यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रात्री साडेनऊच्या सुमारास पक्षाच्या शाखेजवळ हा प्रकार घडला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने प्रदीप पूर्णेकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना स्थानिकांच्या मदतीने कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रदीप पूर्णेकर हे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे भाऊ होते. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी परिसरातील उपलब्ध माहिती आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. हत्या कोणत्या कारणातून झाली आणि या घटनेमागे आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Tags :

.