Ratnagiri Zilla Parishad Election | उदय सामंतांचा शब्द खरा ठरला ; रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेचा झंझावात!
रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेचा ऐतिहासिक विजय
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत शिवसेनेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विरोधकांचा अक्षरशः ‘सुपडा साफ’ करत शिवसेनेने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे.
या निकालानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी परखड प्रतिक्रिया देताना सांगितले की,“उदय सामंत जो शब्द देतो आणि ज्या उमेदवाराचे नाव सांगतो, तोच उमेदवार निवडून येतो, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.”
तालुक्यावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाली आहे. या निकालामुळे उदय सामंत यांचे एकहाती नेतृत्व आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
विरोधकांना मोठा धक्का
या निवडणुकीत विरोधी पक्षांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. अनेक ठिकाणी एकतर्फी लढती पाहायला मिळाल्या, तर काही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे विरोधी गोटात निराशेचे वातावरण आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
या विजयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. फटाके, ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी हा विजय उदय सामंत यांच्या नेतृत्वावर मिळालेला विश्वासाचा कौल असल्याची प्रतिक्रिया दिली.