Satara News : व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा; महायुतीत मिठाचा खडा नको
01:37 PM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
उदय सामंतांचा साताऱ्यातून कानमंत्र, महेश शिंदेंना इशारा, जयकुमार गोरेंवरही सूचक टीका
सातारा: राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी शुक्रवारी सातारा दौऱ्यात पक्ष संघटना, महायुतीतील समन्वय आणि स्थानिक राजकीय वादांवर स्पष्ट भूमिका मांडत शिवसेना पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक शिस्तीचा कानमंत्र दिला. "कोणत्याही व्यक्तीपेक्षा पत्न मोठा असतो," असे ठाम विधान करत त्यांनी आमदार महेश शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला, तर भाजप नेते जयकुमार गोरे यांचे नाव न घेता स्थानिक पातळीवरील भूमिकांवरही सूचक टीका केली.
मंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील बीएलए नियुक्तीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेने संघटनात्मक बांधणी काटेकोरपणे केली असून बहुतांश मतदारसंघांत बीएलए नियुक्तीचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला. वाई आणि सातारा मतदारसंघातील नियुक्त्या पूर्ण झाल्याचे सांगताना त्यांनी निष्ठावान शिवसैनिकांनाच जबाबदारी देण्यासाठी विशेष पडताळणी प्रक्रिया राबविल्याचे स्पष्ट केले. फलटणमधील वादासंदर्भात प्रश्नावर सामंत विचारलेल्या म्हणाले, "मी कोणाचेही वैयक्तिक नाव घेतले नव्हते.
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांनाच इशारा दिला होता." प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद वाढवण्याचा अधिकार असला तरी महायुतीमध्ये परस्पर सन्मान आणि समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 'सातारा आणि सोलापूर मध्येनिर्माण होणारी परिस्थिती नेमकी कोणामुळे होते, हे जनतेलाही माहिती आहे," असे म्हणत त्यांनी स्थानिक भाजप नेतृत्वावर निशाणा साधला. काही मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांबाबत बैठकीत कारवाई अथवा बरखास्तीचे निर्णय होऊ शकतात, असे संकेत दिले.
"महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी भूमिका कोणी घेऊ नये," असे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांनी निधीपेक्षा प्रेम आणि सन्मानाला अधिक महत्त्व दिल्याची भावना व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीबाबत पुढील २४ तासांत राजकीय चित्र स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगेंनी उपोषण करू नये
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी भावनिक विनंतीही केली, साताऱ्यातील दौऱ्यातून उदय सामंत यांनी एकीकडे शिवसेनेची संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर स्पष्ट संदेश देत पक्षशिस्तीची रेषा अधोरेखित केली,
Advertisement
Advertisement