युवा काँग्रेस अध्यक्षपदी उदय भानु चिब
श्रीनिवास बीवी यांना पदावरून केले दूर : जम्मू-काश्मीर निवडणुकीदरम्यान निर्णय
वृत्तसंस्थाश्रीनगर/नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने पक्षसंघटनेत या केंद्रशासित प्रदेशाला मोठे महत्त्व दिले आहे. पक्षाने भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव उदय भानु चिब यांना नवे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. उदय भानु चिब हे श्रीनिवास बीबी यांची जागा घेणार आहेत.
उदय भानु चिब यांच्या नियुक्तीला संघटनेत बदल करण्याच्या धोरणाशी जोडून पाहिले जात आहे. 43 वर्षीय श्रीनिवास बीवी हे दीर्घकाळापासून युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.
मूळचे जम्मू-काश्मीरचे असलेले चिब हे सध्या भारतीय युवा काँग्रेसचे महासचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होते. तर यापूर्वी ते जम्मू-काश्मीर प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. काँग्रेसने श्रीनिवास बीवी यांना ऑगस्ट 2019 मध्ये युवा काँग्रेसची धुरा सोपविली होती. आता त्यांच्या जागी नियुक्ती झालेले उदय भानु चिब हे युवा काँग्रेसचे 20 वे अध्यक्ष ठरले आहेत. युवा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून नारायण दत्त तिवारी यांनी काम केले होते.
यापूर्वी जम्मू-काश्मीरशी संबंधित गुलाम नबी आझाद हे युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. आझाद हे 1980-82 या कालावधीत युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर युवा काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून आतापर्यंत केवळ एकाच महिलेने जबाबदारी सांभाळली आहे. अंबिका सोनी यांना हा मान जातो.
उदय भानु चिब यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. माझे नेते राहुल गांधी यांच्यासोबत एक स्मरणीय भेट, सामाजिक न्यायासाठी त्यांचा संघर्ष आणि दृढता आम्हा सर्वांसाठी प्रेरणा असल्याचे उद्गार उदय भानु चिब यांनी या भेटीनंतर काढले होते.