For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव संमेलन ग्रंथदिंडी लक्षवेधी-ऐतिहासिक

11:02 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगाव संमेलन ग्रंथदिंडी लक्षवेधी ऐतिहासिक
Advertisement

गांधी चौकातून दिंडीला सुरुवात : जयघोषाने परिसर दुमदुमला : साहित्याचे वेगळेपण जपण्याचा पायंडा यावर्षीही

Advertisement

वार्ताहर /उचगाव

उचगाव मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडीचा सोहळा वाखाणण्यासारखा  असतो. प्रत्येक वर्षी वेगळेपण जपण्याचा, सादर करण्याचा पायंडा उचगाव साहित्य संमेलनाने जपला आहे. संत-महंत आणि विचारवंतांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि भजनाच्या मंगलमय वातावरणात 22 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी ऐतिहासिक आणि लक्षवेधी ठरली. प्रारंभी सकाळी 9.30 वाजता उचगावच्या मध्यवर्ती गांधी चौकातील गणेश-विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून दिंडीला सुरुवात झाली. पालखीचे पूजन परशराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश पूजन, विठ्ठल रखुमाईचे पूजन, श्रीराम पूजन आणि ग्रंथदिंडीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीत अग्रभागी भगवे ध्वजधारी युवक, लेझीम, लाठीमेळा तसेच विविध वेशभूषेतील बालचमू व युवक याबरोबरच चित्ररथ आणि लेझीम पथक व बेकिनकेरे, बसुर्ते, कोणेवाडी, सावगाव, उचगाव भागातील भजनी मंडळे लक्ष वेधून घेत होते. ज्ञानोबा, तुकारामच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दिंडी मार्गावर भगव्या पताका आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. दिंडीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्गामाता दौड व अनेक मंडळांचे पदाधिकारी, युवक, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासकरून घोड्यावर हभप ज्ञानेश्वर पठाडे विराजमान झाले होते. ग्रंथदिंडी गणपत गल्लीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन दिगंबर पवार आणि सुवर्णा पवार दांपत्याच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

यानंतर कोवाड रोडमार्गे ग्रंथदिंडी मळेकरणी देवस्थानकडे प्रस्थान झाली. येथे मळेकरणी देवीचे पूजन शिवाजीराव अतिवाडकर व सुमन अतिवाडकर दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते, सभामंडपाचे उद्घाटन अडत व्यापारी मोहन बेळगुंदकर व बसवंत मायाण्णाचे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठाचे उद्घाटन उचगाव ग्रा.पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सरस्वती फोटो पूजन आर्किटेक्ट इंजिनिअर आर. एम. चौगुले आणि प्रीती चौगुले, ज्ञानेश्वर फोटो पूजन जीवन कदम व नीलम कदम दांपत्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बेळगुंदी येथील बालवीर स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि मराठी गौरव गीत सादर केले. या संमेलनप्रसंगी दै. तरुण भारतच्या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी संमेलनाच्या वाटचालीचा आढावा घेतला. सचिव एन. ओ. चौगुले आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. संमेलनाचे उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते गावातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करून वेगळा आदर्श घालून केले. सत्कार समारंभप्रसंगी हार, फुले यांना फाटा देऊन गोड गुळाचा रवा, पुस्तक व नारळ देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन विजय खांडेकर यांनी तर आभार एन. ओ. चौगुले यांनी मानले. ग्रंथदिंडीत बी. एस. होनगेकर, अशोक हुक्केरीकर, गणपत पावले, नेहाल जाधव, सुनील देसाई, बाळासाहेब देसाई, वामन कदम, कृष्णाजी कदम-पाटील, महादेव तुपारे, जीवन होनगेकर, उषा होनगेकर, सिंधु चौगुले, भाविका होनगेकर, श्रुती चौगुले यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हास्य कविसंमेलन : मार्मिक आणि वास्तव!

मार्मिक टिप्पणीने प्रेक्षकांचे मनोरंजन : चिमुरडीचा पोवाडा ठरले अंजन

तिसऱ्या सत्रात झालेल्या हास्यकवी संमेलनात नामवंत कवींनी बहारदार कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘लग्नाची घाई’, ‘अफू’, ‘मदिरा माहात्म्य’, ‘पंगत’, ‘आई’, ‘वाटणी’ अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करण्यात आल्या. समाजातील सध्य घटनांवर मार्मिक टिप्पणी करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत काळजाला भिडणाऱ्या कविता सादर करण्यात आल्या. कवी नितीन वराणकर यांनी ‘लग्नाची घाई’ ही कविता सादर करून विवाहादरम्यान झालेली घाई व विवाहानंतर कुटुंब सांभाळताना पुरुषाला करावी लागणारी कसरत याचे मार्मिक वर्णन वऱ्हाडी भाषेत सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. कवी शरद तुकाराम धनगर यांनी ‘मदिरा माहात्म्य’ ही कविता सादर करून मद्यप्राशनानंतर तोंडून बाहेर पडणारी मजेशीर इंग्रजी सादर केली.

‘तुमच्यासाठी घ्यायलो लाईट लाईट

लागते हवा तशी उडते माझी फ्लाईट

गावठी पिऊन म्हणतो गुडनाईट’

असे इंग्रजी शब्द दारू प्यालेल्याच्या तोंडून बाहेर पडतात व पाहणाऱ्यांची कशी गंमत होते, ते त्यांनी सादर केले. कवी अरुण पवार यांनी ‘अफू’ कविता सादर करून गांधीजींनी खेड्याकडे चला या दिलेल्या संदेशातून काय साध्य झाले? यावर प्रश्न उपस्थित केला. ग्रामीण भागातील जनता अद्यापही कष्टातच जीवन कंठत आहे. त्यांच्या पदरी सुख आलेले नाही. शेतकरी पिके पिकवत असला तरी ती विकण्णरा व्यापारीच मालामाल होतो. सरकारी कार्यालयांमध्ये गांधीजींचा फोटो असला तरी टेबलाखालून घेतली जाणारी लाच यावर त्यांनी मार्मिक टिप्पणी केली. ‘वाटणी’ या कवितेच्या माध्यमातून समाजातील विदारक सत्य त्यांनी मांडले. आज समाजात अनेकजण मोठ्या तोऱ्याने वागत असले तरी घरी परिस्थिती मात्र वेगळी असते. आई-वडिलांना न सांभाळता संपत्तीची वाटणी झाल्याप्रमाणे आई-वडिलांचीही वाटणी केली जाते. काही जणांकडून आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखविली जाते. हे सध्या समाजातील चित्र असून ही विषवल्ली थांबली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ प्रामाणिकपणे केला पाहिजे, असा संदेश त्यांनी या कवितेतून दिला. शरद धनगर यांनी गझल सादर करून भंग पावलेले प्रेम याबरोबरच मातीशी असणारी नाळ गझलेतून सादर केली.

‘नको ना पुन्हा तो इशारा करू तू

नको आठवांचा पसारा करू तू

सखी वाचताना पुन्हा प्रेमपत्रे

नको काळजाचा निखारा करू’

या प्रेमाच्या संदर्भातील संवादांसह ‘जरा पावसा दे भुईला सहारा, नको ना करू जगाचा कोंडमारा’ असे सांगत शेतकऱ्याची जगाशी असणारी नाळ व जगाचे कल्याण यातून त्यांनी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

आवेशपूर्ण पोवाडा

कपाळावर चंद्रकोर व दाढी वाढवून शिवाजी महाराज होता येत नाही, तर महाराजांचे गुण आचरणात आणण्याची सध्या गरज आहे. शिवबासारखा लाखातच नव्हे तर संपूर्ण जगात दुसरा नाही. सध्याच्या घडीला नवीन पिढी व्यसनाच्या आहारी जात असून केवळ महाराजांच्या नावाने दिखाऊपणा केला जात आहे. जाती-पातीमध्ये भांडणे लावली जात आहेत. सर्व जात-धर्म गौण मानून स्वराज्य स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची या जगाला पुन्हा गरज आहे. यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा, असा आवेशपूर्ण पोवाडा तुरमुरी येथील अंजली तांबूळकर हिने जिजाऊंच्या वेषात सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

माणसाने आंतरमनातून स्वच्छ राहणे आवश्यक : ज्ञानेश्वर पठाडे

ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यामध्येच जीवनाचे सार आहे. संत ज्ञानोबाराय यांनी आपल्या पाठीवर भाकरी भाजून दाखविली. रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून घेतले, चांगदेवाचे गर्वहरण केले. ज्ञानाबरोबर विज्ञानाचाही उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण रोज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. यामुळे बुद्धी वृद्धिंगत होते, संत साहित्याचा जागर होतो. माणसाने आंतरमनातून स्वच्छ राहिले पाहिजे. यासाठी ग्रंथ महत्त्वाचे ठरतात, असे मनोगत उचगाव येथील दुसऱ्या सत्रात कर्जत, अहमदनगर येथील प्रसिद्ध युवा कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर पठाडे यांनी व्यक्त केले. संत साहित्य या विषयावर ज्ञानेश्वर पठाडे महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘माझ्या मराठीचा बोलू कौतुके’ याप्रमाणे 22 वर्षांपासून या भागात मराठी भाषेचा जागर सुरू आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याप्रमाणे ‘जसे पेराल तसे उगवते’, हे साहित्य संमेलन सध्याच्या तरुणांना मार्गदर्शक  ठरणारे आहे, असे सांगितले.

ज्ञानोबाराय हे ज्ञानयोगी, भक्त, वारकरी, शिष्य, गुरु यांचा संगम आहेत. योगी हा पावन मनाचा असतो. वारकरी संप्रदायाची रचना महत्त्वाची आहे. समाजात वाचाळ बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. चांगल्या विचारांची देवाण-घेवाण साहित्य संमेलनांतून होते. परमार्थ, देशसेवा, जनसेवा करण्यासाठी प्रयत्नशील राहा. हल्ली जमिनीला अधिक भाव आला आहे. त्यामुळे बहीण-भावाचं प्रेम दुरावू लागलं आहे. आपली नाती जपा, बहीण-भावाचं प्रेम टिकलं पाहिजे, यासाठी ज्ञानोबा, मुक्ताई यांचा आदर्श घ्या. तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडविली गेली तरीही त्यांनी समाजाच्या हितासाठीच आध्यात्मिक कार्य केले. साधू हा समुद्राच्या पलीकडेही पाहू शकतो. कारण तो योगी आहे. साधू हे इतरांचे मनोगत ओळखतात, असे त्यांनी सांगितले.

राजकारणी लोकांच्या नादी लागू नका. राजकारणी व्यक्ती कधीही आणि केव्हाही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे कार्यकर्ते मात्र एकमेकांचे विरोधक बनतात. शिक्षण पैशाने मिळविण्याचे प्रकार वाढले आहेत. समाजात लबाड्या वाढल्यामुळे मुलांवर सुसंस्कार घडविणे महत्त्वाचे आहे. मुलगा-मुलगी यामध्ये भेदभाव करू नका. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. त्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. त्यांनी अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार आत्मसात केले पाहिजेत.  तरुणांमध्ये तेजस्विता, तत्परता हे गुण असले पाहिजेत, असेही पठाडे महाराजांनी सांगितले. अभ्यासामुळे माणूस मोठा होतो, त्यामुळे तरुणांनी अभ्यास करावा, कष्टाला महत्त्व द्यावे, स्वत:च्या भाषेबद्दल स्वाभिमान बाळगावा, संत हे ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यामध्ये आहेत, असेही सांगितले. त्यांनी क ख ग अशा बाराखडी शब्दांचा आध्यात्मिक शब्द आणि अर्थही सविस्तर पटवून दिला. तरुणपण हे आयुष्यातला वसंत ऋतू आहे. त्यामुळे कष्ट करा, नीती ठेवा आणि देशाचे नाव उज्ज्वल करा, असेही ज्ञानेश्वर पठाडे महाराज यांनी व्याख्यानातून सांगितले.

Advertisement
Tags :

.