उचगाव मळेकरणी सप्ताह :देसाई भाऊबंद कमिटीचा खुलासा
बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी देवी सप्ताह उत्सव सर्वांनी मिळून एकत्रित व परस्पर सामंजस्याने साजरा करावा, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. मात्र, ‘तरुण भारत’मधील दि. 12 मार्च रोजी प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णत: चुकीच्या माहितीवर आधारित दिली आहे, असा खुलासा देसाई भाऊबंद कमिटी उचगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वांना सोबत घेऊन हा सप्ताह साजरा करावा, असा आदेश दिला असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी व मानकऱ्यांनी न्यायालयात आपली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने नागरिकांच्या भावना आणि श्रद्धा विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी हा वाद परस्परांमध्ये मिटविण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे वादी-प्रतिवादी यांच्याकडून न्यायालयात जॉईंट मेमो सादर करण्यात आला. त्यानंतर दोन्ही पक्षकारांनी एकत्रित सप्ताह उत्सव साजरा करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, मानकऱ्यांकडून मळेकरणी देवस्थानाचे प्रवेशद्वार नव्याने उभारले असून त्याचा उद्घाटन सोहळा अद्याप व्हायचा असल्याने त्यावर आच्छादन घातले आहे, असे देसाई भाऊबंद कमिटी सदस्य डॉ. प्रवीण देसाई यांनी स्पष्ट केले आहे.