उचगाव मळेकरणीदेवी सप्ताह उत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा
न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल : उचगाव ग्रामस्थांसह भाविकांमधून निर्णयाचे स्वागत : दरवर्षीप्रमाणेच सप्ताह उत्सव होणार
बेळगाव : उचगाव येथील जागृत देवस्थान श्री मळेकरणी देवी सार्वजनिक सप्ताह उत्सवावर देसाई भाऊबंध कमिटीच्यावतीने न्यायालयामध्ये मनाई आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र ग्रामस्थांनीही मनाई मिळू नये आणि हा सप्ताह उत्सव थांबविला जाऊ नये, अशा प्रकारचा युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने यावर सारासार विचार करून गेली 105 वर्षे सुरू असलेल्या सप्ताह उत्सवाला कोणीही मनाई आणू नये, तो पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावा, हा भावनिक प्रश्न असल्याने थांबविता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे उचगाव ग्रामस्थांमधून आणि भाविकांमधून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
गेल्या रविवारी ग्रामस्थांनी मळेकरणी देवीच्या मंदिर आणि परिसराची उत्सवानिमित्त स्वच्छता केली होती. स्वच्छता मोहिमेनंतर सायंकाळी देसाई भाऊबंद कमिटीने मळेकरणी देवीच्या मंदिराकडे जाण्याच्या गेटला कुलूप लावून मंदिरामध्ये कोणीही प्रवेश करू नये यासाठी गेट बंद करून कापड बांधले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. 105 वर्षांपासून ग्रामस्थांच्यावतीने मळेकरणी मंदिरामध्ये होळी पौर्णिमेला सार्वजनिक सप्ताह उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या पाच दिवसांमध्ये दररोज संध्याकाळी करमणुकीचे कार्यक्रम आयोजिले जातात, तसेच सकाळ व सायंकाळी होणाऱ्या महाआरतीला हजारो भाविक उपस्थित राहतात.
या उत्सवावर मनाई आणण्याचा प्रयत्न देसाई भाऊबंध करीत होते. त्यामुळे संपूर्ण उचगाव पंचक्रोशीमध्ये संतापाची लाट पसरली होती. उचगाव मळेकरणी मंदिर आवारामध्ये दर मंगळवार शुक्रवारी होणारी पशुहत्या बंद केल्यामुळे देसाई भाऊबंद यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. पशुहत्येमुळे गावाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तसेच गावातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारी नियमाप्रमाणे उचगाव मळेकरणी कार्यक्षेत्रामध्ये पशुहत्या बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व देसाई भाऊबंद मळेकरणी देवी परिसरामध्ये गावच्या लोकांनी कोणीही यायचे नाही व सप्ताह उत्सवही करायचा नाही,
यावर मनाई घेण्याचा प्रयत्न मंगळवारी न्यायालयामध्ये केला होता. त्यांनी उचगाव ग्राम पंचायत अध्यक्ष मथुरा बाळकृष्ण तेरसे व पुंडलिक कदम-पाटील यांना पक्षकार करून न्यायालयात दावा दाखल केला होता. सप्ताह उत्सवावर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे उचगावसह पंचक्रोशीतील सर्व भाविक व नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. सर्व भाविक नाराज झाले होते. देवाच्या दर्शनासाठी बंदी घालण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मंगळवारी देण्यात आल्याने उचगावमधील भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. देसाई भाऊबंदपैकी काही मंडळींचा सप्ताह करण्यासाठी पाठिंबा आहे. त्यांनी ग्रामस्थांबरोबर जाण्याचा आणि सप्ताह करण्याचाही पाठिंबा दर्शविलेला आहे. या निर्णयामुळे आता उचगावचा दरवर्षी होणारा सार्वजनिक सप्ताह उत्सव होणार असल्याचे मळेकरणी सप्ताह उत्सव कमिटीने कळविले आहे.