For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुब्रमणी देशाचे नवे ‘सीडीएस’

06:25 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुब्रमणी देशाचे नवे ‘सीडीएस’
Advertisement

भारताचे तिसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला;  पाकिस्तान-चीनसंबंधी व्यापक तज्ञ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची नवे संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी रविवारी पदभार स्वीकारला. केंद्र सरकारने मे महिन्याच्या प्रारंभी त्यांच्या नियुक्तीसंबंधीची घोषणा केली होती. सुब्रमणी यांच्याकडे संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवपदाची जबाबदारीही असेल. विद्यमान सीडीएस अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपल्यानंतर आता सुब्रमणी तिसरे संरक्षण दल प्रमुख बनले आहेत.

Advertisement

एन. एस. राजा सुब्रमणी हे सुमारे 39 वर्षांच्या सेवेनंतर 31 जुलै, 2025 रोजी उप-सेनाप्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील आदेशापर्यंत सुब्रमणी हे भारत सरकारच्या संरक्षण व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. ते 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, त्यांनी 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2025 पर्यंत लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले होते. त्यांनी मार्च 2023 ते जून 2024 पर्यंत सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही काम पाहिले होते. लष्करी सेवेचा व्यापक अनुभव आणि अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर आता त्यांची देशाचे नवीन संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुब्रमणी यांनी भारतीय सैन्यात जवळपास 39 वर्षे सेवा बजावली आहे. त्यांना डिसेंबर 1985 मध्ये भारतीय लष्कराच्या गढवाल रायफल्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले होते. आपल्या प्रदीर्घ लष्करी कारकिर्दीत त्यांनी देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. तसेच ऑपरेशनल तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे भारतीय सैन्यात त्यांच्या शिस्त, नेतृत्व आणि सामरिक ज्ञानासाठी ओळखले जातात. सैन्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत असताना त्यांनी देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

सुरक्षा मजबुतीसाठी एकजुटीने कार्यतत्पर

दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्स येथे सुब्रमणी यांना मानवंदना देण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, संरक्षण मंत्रालय आणि सर्व संबंधित संस्था देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्यतत्पर राहतील, अशी हमी त्यांनी दिली. भारतीय लष्करामध्ये स्वदेशी शस्त्रs आणि लष्करी उपकरणांचे आधुनिकीकरण, खरेदी आणि वापर यांना गती दिली जाईल. लष्कराची ताकद वाढवण्यासाठी नवीन विचार आणि नवीन पद्धती अवलंबल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लष्करामध्ये थिएटर कमांड मॉडेलची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य

नवे सीडीएस सुब्रमणी यांच्यापुढील पहिले कार्य लष्करामध्ये थिएटर कमांड मॉडेलची अंमलबजावणी करणे हे असेल. पुण्यातील एनडीएच्या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी थिएटर कमांड प्रणालीवर भाष्य  करताना ही प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे सांगितले होते. थिएटर कमांड मॉडेलसंबंधी संरक्षणमंत्र्यांना एक संपूर्ण अहवाल सादर करण्यात आला आहे. विविध स्तरांवर त्याचे पुनरावलोकनही सुरू आहे. तिन्ही सेवांच्या मूळ हितांचा विचार करून ही प्रणाली पुढील दोन ते तीन वर्षांत प्रत्यक्षात लागू केली जाऊ शकते. सध्या, भारताकडे तिन्ही सेवांसाठी एकूण 17 स्वतंत्र कमांड आहेत. लष्करी कारवाईदरम्यान तिन्ही सेवा एकत्र काम करत असल्या तरी, त्यांची कमांड स्वतंत्र राहते. थिएटर कमांड प्रणालीमध्ये एका विशिष्ट क्षेत्रासाठी किंवा मोहिमेसाठी एकच कमांडर असेल आणि तिन्ही युनिट्स एकत्र काम करतील.

Advertisement
Tags :

.