उभा मारुती, सोन्या मारुती, जेल मारुती आणि गाऱ्हाणे मारुतीही...
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
नवस, उपास, तपास याचा फार गवगवा नाही. त्याची पूजा सुवर्ण अलंकारानेच केली पाहिजे, अशी पद्धत नाही. ताट भरून नैवेद्य नाही. तो उत्तरेचा, दक्षिणेचा, कोकणातला, घाटावरचा अशी त्याची कधी विभागणी झालेली नाही. मंदिर चकचकीत, लखलखीत असले पाहिजे, अशी तर त्याची कधी अटच नाही. त्यामुळे त्याचे मंदिर असल्याशिवाय कोणत्याही गावाला शोभाच येत नाही. एवढंच काय, त्याचे मंदिर नाही, असे एकही गाव नाही. हा देव म्हणजे मारुती. समाजातील सर्व घटकांनी आपला मानलेला मारुती अर्थात हनुमान जयंती शनिवारी आहे
जिह्यातल्या निम्म्या गावांचा कुलस्वामी हा मारुतीच असल्याने मारुतीच्या जत्रेने गावे सजली आहेत. चावडीसमोर खेळणे, पाळणे लागले आहेत. माहेरवासिनी हक्काने गावची जत्रा म्हणून माहेरला आल्या आहेत. मारुतीच्या जत्रेदिवशी नव्या गाड्या बाहेर काढायच्या म्हणून गावातील काही घरांत नव्या दुचाकी, चारचाकी घेतल्या आहेत. जत्रेच्या निमित्ताने पालखी आहेच. पण तरुण पोरांनी ही पट्टी काढून डीजे आणले आहेत. अलीकडच्या काळातली नवीनच प्रथा अशी की रात्रभर देवळात हनुमान चालीसाचे पठण सुरू आहे. अर्थात हा झाला धार्मिक भाग. पण प्रत्येक गावातील मारुतीच्या जत्रेला आणि कोल्हापूर शहरातील 30 तीसहून अधिक मारुतीच्या देवळांना खूप चांगली सामाजिक आणि सांस्कृतिक अशी परंपरा आहे. बिन नवसाचा देव म्हणून तो प्रत्येक घटकाशी एकरूप झाला आहे.
कोल्हापूर शहरात तर या मारुतीला लाडाने वेगवेगळी नावे दिली गेली आहेत. अगदी हक्काने एकेरी नावाने त्या मारुतीला लोक मानत आहेत आणि हा अगदी गावगाड्यातला मारुती आपले नाते टिकवून राहिला आहे. मारुतीच्या या लाडक्या नावामध्ये काही घटना प्रसंग किंवा निमित्त दडले आहेत. शिवाजी पेठेतला उभा मारुती. त्याची सहा फूट उंचीची मूर्ती उभी म्हणून त्याचे नावच उभा मारुती पडले आहे. आज शिवाजी पेठ अशी या पेठेची ओळख असली तरी नवीन बुधवार पेठ अशी त्याची मूळ ओळख. आणि त्याआधी रंकाळा आणि वरूणतीर्थ तळ्याच्या मध्ये वसलेली कोल्हापूरची एक पेठ अशी ही ओळख. या पेठेची कोल्हापुरी परंपरा अगदी रुबाबदार आणि ऐटदार. या पेठेच्या मध्यावरच हे मारुतीचे मंदिर आहे. किंबहुना कोल्हापुरात ज्या ज्या सामाजिक, राजकीय चळवळी झाल्या, त्या सर्व चळवळीचा हा मारुती साक्षीदार राहिला आहे. किंवा त्याला साक्षीला ठेवूनच चळवळीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आज या मंदिराची जपणूक नव्या पिढीनेही खूप श्रद्धेने केली आहे.
कोल्हापूर शहर पूर्वी म्हणजे 1869 सालापर्यंत तटबंदीच्या आत होते आणि सभोवती असलेल्या तटबंदींना पाच प्रवेशद्वारे होती. त्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ मारुतीचे मंदिर होते. त्याला वेशीवरचा मारुती असे नाव होते. आज तटबंदी नाही . पण वेशीवरचे हे मारुती आहेत. रविवार वेशीवर म्हणजे बिंदू चौकाजवळ, शनिवार वेस म्हणजे महापालिकेजवळ शनि मारुती, मंगळवार वेस म्हणजे कोळेकर तिकटी, गंगावेश म्हणजे गंगावेश चौकात आजही ही मारुतीची मंदिरे आहेत. याशिवाय रविवार वेशीच्या तटबंदीच्या आत बिंदू चौक कारागृहाच्या आवारात एक मारुतीचे मंदिर आजही आहे. जेल मधला मारुती अशी त्याची ओळख आहे. जुना बुधवार पेठेत द्विमुखी म्हणजे पुढे व मागे चेहरा असलेला द्विमुखी मारुती आहे. पंचगंगा नदीच्या घाटावर जिजाबाईचा मारुती आहे, हा घाट जिजाबाईंच्या नावावर आहे आणि या घाटाच्या सुरुवातीला मारुतीची मूर्ती आहे. शुक्रवार पेठ धर्मशाळेजवळ इशारा मारुती आहे. या मारुतीच्या मंदिरापर्यंत पंचगंगेच्या पुराचे पाणी आले की महापुराचा इशारा समजला जातो. किंवा त्या मंदिरापुढे पाणी न जाता बहुतेक वेळी पूर्ण हळूहळू ओसरू लागतो. या मारुतीच्या मंदिरावर ही महापुराचा उल्लेख आहे. 2005, 2021 साली मात्र या मारुतीच्या मंदिरापुढे पंचगंगेच्या महापुराचे पाणी गेले होते. याशिवाय कोल्हापुरात एक रेल्वे मारुती आहे. रेल्वेच्या पार्सल सेवेतून एक जाडजोड पार्सल आले होते. ते सोडवून घ्यायला कुणी आलेच नाही. त्याच्या नावावर पार्सल आले, त्याचाही शोध लागला नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे पार्सल फोडले त्यात मारुतीची मूर्ती होती. ही मूर्ती रेल्वे कर्मचारी श्रद्धेने पूजत राहिले व स्टेशनच्या समोर वरील मोकळ्या जागेत त्याचे मोठे मंदिर बांधले. रेल्वे मारुती असेच त्याचे नाव पडले.
जयप्रभा स्टुडिओच्या दगडी पारावर असलेला मारुती म्हणजे स्टार मारुती आहे. स्टुडिओ चित्रीकरण झालेल्या सर्व चित्रपटाच्या मुहूर्ताचा नारळ याच मारुतीसमोर फुटला आहे. या मारुतीसमोर क्षणभर तरी अभिनेते हात जोडून उभे राहतात, अशी परंपरा आहे. बागल चौकाजवळ आंबले मार्केटसमोर पंचमुख मारुती आहे. उत्तरेश्वर येथे अकरा मारुतीचे एकत्रित शिल्प आहे. कसबा बावड्यात तर मारुतीच्या नावानेच हनुमान गल्ली आहे. त्याची जत्रा उत्साहात भरते.
सीपीआर हॉस्पिटल आवारातला मारुती म्हणजे गाऱ्हाणे मारुती आहे. आजारपणातून सुटका होऊ दे, अशी प्रार्थना रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक या मारुती समोर हात जोडून करत असतात.
सोन्या मारुती चौकातला मारुती तर सार्वजनिक जीवनातला मारुती आहे. या चौकात या मारुतीच्या साक्षीनेच दिवस मावळला की रात्री उशिरापर्यंत लोक गप्पा मारत बसलेले असतात. जयंतीला मोठा महाप्रसाद घालतात. कोळेकर तिकटीचा मारुती, राजारामपुरी मारुती, जरंडेश्वर मारुती, शेंडा पार्कातला मारुती, दसरा चौकातला मारुती, सर्किट हाऊसमधला मारुती असे वेगवेगळे मारुती कोल्हापूरच्या समाज जीवनाचा घटकच होऊन गेले आहेत.
कोल्हापुरात प्रत्येक लग्नात अक्षताच्या मुहूर्ताच्या अगोदर नवऱ्या मुलाला मारुती दर्शनाला नेले जाते. श्री बंधन असे या विधीला म्हटले जाते. आता बहुतेक विवाह मंगल कार्यालयात असल्याने व ही मंगल कार्यालय गावापासून लांब अंतरावर असल्याने प्रत्येक मंगल कार्यालयात ही या विधीसाठी मारुतीची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे.