उबाठा शिवसेनेची अवैध धंदे सुरू करण्याची मागणी
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज विभागातील परिस्थिती दुर्लक्ष केल्याने शहरात भीषण चित्र
कोल्हापूर
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यात मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू, गावठी दारू, गांजा, लॉजवरील अनैतिक उद्योग, काही कॅफेतून सुरू असलेला प्रकार राजरोजपणे होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष असून आता या विभागात मटका, जुगार अड्डा, दारू विक्रीला रितसर परवानगी मिळावी अशी मागणी उबाठा शिवसेनेने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे करत खळबळ उडवली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, राजू रेडेकर, अवधूत पाटील, दिलीप माने, युवराज पोवार, अजित खोत, वसंत नाईक, सुधाकर जगताप, प्रकाश रावळ, मनिष हावळ आदींनी सदर निवेदन दिले आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यात अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे दिवसेदिवस हे धंदे वाढले आहेत. गडहिंग्लज शहरात तर भीषण चित्र असून शहरात राजरोस मटका तेजीत सुरू आहे.
अनेक गावात छुप्या पध्दतीने दारू विक्री सुरू असून याची उघड चर्चा होताना दिसते. ग्रामपंचायतीमध्ये ठराव होऊन ही पोलीस संबंधितावर कारवाई करताना दिसत नाही. अवैध धंद्याबाबत विचारणा करणाऱ्या सरपंचालाच उलट पोलीस खाक्या दाखवल्याचा आरोप या निवेदनात केला. हलकर्णी भागात क्बल आणि मटका याच्या ईष्येतून झालेली मारामारी चर्चेचा आहे. चंदगडवरील एका लॉजवरील क्लिपची चर्चा सुरू झाल्यानंतर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्याचा प्रकार घडला. तातडीने अवैध धंदे बंद करावेत अन्यथा सर्वच धंदे राजरोजपणे खुल्या व मुक्त वातावरणात चालविण्यासाठी पोलिसांनी परवानगी द्यावी अशी मागणी केली. तातडीने हे अवैध धंदे बंद करण्याकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्यास उघडपणे चालवण्यासाठी पोलीस परवानगी देण्यासाठी यात लक्ष घालतील असा विश्वास व्यक्त केला आहे.