येमेनमधून परतणार युएईचे सैनिक
दहशतवादविरोधी कारवाईही रोखली : सौदी अरेबियाने केला होता बंदरावर हल्ला
वृत्तसंस्था/ दुबई
संयुक्त अरब अमिरातने (युएई) येमेनमधून स्वत:चे सैन्य मागे बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. येमेनमध्ये सुरू असलेली आमची दहशतवादविरोधी मोहीम देखील संपुष्टात आणत आहोत असे युएईने म्हटले आहे. सौदी अरेबियाने युएईवर येमेनमधील फुटिरवादी गट एसटीसीला बळ पुरविण्याचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी येमेनमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारने युएईला 24 तासांच्या आत येमेनमधून स्वत:चे सैन्य मागे घेण्याचा निर्देश दिला होता. या मागणीला सौदी अरेबियाचेही समर्थन मिळाले होते. याच्या काही वेळातच युएईने स्वत:चे सैन्य मागे बोलाविण्याची घोषणा केली आहे.
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने मंगळवारी येमेनच्या मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला केला होता. मुकल्ला बंदरावर पोहोचलेल्या जहाजातून युएईने शस्त्रास्त्रs पाठविली होती असा आरोप सौदी अरेबियाने केला होता. ही शस्त्रास्त्रs येमेनच्या दक्षिण हिस्स्यात सक्रीय फुटिरवादी संघटना सदर्न ट्रान्सिशनल कौन्सिलला (एसटीसी) पुरविण्यात येणार होती असा दावा सौदीने केला होता.
एसटीसी प्रथम येमेनच्या सरकारसोबत मिळून हुती बंडखोरांच्या विरोधात लढत होता, परंतु डिसेंबर महिन्यात एसटीसीने सौदीचे समर्थनप्राप्त सरकारी सैन्याच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. येमेनच्या दक्षिण हिस्स्याला स्वतंत्र करू इच्छित असल्याचे एसटीसीचे सांगणे आहे.
युएईने फेटाळले आरोप
युएईने सौदी अरेबियाच्या आरोपांना पूर्णपणे चुकीचे ठरविले आहे. येमेनला पाठविण्यात आलेल्या खेपमध्ये शस्त्रास्त्रs नव्हे, तर वाहने होती, ज्यांचा वापर तेथे तैनात असलेले युएईचे सैनिक करणार होते. आम्ही येमेनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो आणि तेथे दहशतवादाशी लढण्याच्या बाजूने आहोत. येमेनचे भविष्य आणि त्याची सीमा येमेनच्या लोकांनीच निश्चित करावी असे युएईच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
येमेनकडून संरक्षण करार रद्द
मुकल्लावर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर येमेन सरकारने संयुक्त अरब अमिरातसोबत करण्यात आलेला संरक्षण करारही रद्द केला आहे. याचबरोबर सरकारने स्थितीवर नियंत्रणासाठी 27 तासांची हवाई, भूमी आणि सागरी नाकाबंदी लागू करणे आणि 90 दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अल-अलीमीने फुटिरवादी गटांच्या विरोधात कारवाईवरून सौदी अरेबियाच्या समर्थनाचे कौतुक पेले आणि हे पाऊल येमेनचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय स्थिरतेच्या हिताचे असल्याची टिप्पणी केली आहे.
फुटिरवादी भावना
सदर्न ट्रान्सिशनल कौन्सिल (एसटीसी) एक सशस्त्र फुटिरवादी संघटना असून त्याला युएईचे समर्थनप्राप्त आहे. एसटीसीचा उद्देश येमेनला उत्तर आणि दक्षिण या दोन वेगळ्या देशांमध्ये विभागणे आहे. यानंतर दक्षिण येमेनमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची एसटीसीची इच्छा आहे. 1990 पूर्वी येमेन उत्तर आणि दक्षिण येमेन या हिस्स्यांमध्ये विभागलेला होता. दोन्ही हिस्स्यांच्या एकीकरणानंतरही दक्षिणेत वेगळे होण्याची भावना कायम आहे.
सौदी अरेबियाने हल्ला का केला?
मागील एक महिन्यात एसटीसीने येमेनमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य अभियान चालविले आहे. एसटीसीच्या सैन्याने हद्रामौत आणि अल-महा यासारख्या तेल आणि गॅससमृद्ध भागांवर कब्जा केला आहे. यामुळे येमेन सरकारच्या सैन्य आणि स्थानिक टोळ्यांना मागे हटावे लागले आहे. डिसेंबर महिन्यात एसटीसीने अनेक महत्त्वपूर्ण तेल आणि गॅस क्षेत्रांवर नियंत्रणाचा दावा केला. दक्षिण अबयान प्रांतात नव्या सैन्य अभियानाची घोषणा केली. याच्या प्रत्युत्तरादाखल सौदीने वादी नहाब भागात इशारादाखल हवाई हल्ले केले. एसटीसी मागे न हटल्यास आणखी कठोर कारवाई होईल असे सौदीने स्पष्ट केले आहे.