दुबईमध्ये यूएई महाराष्ट्र क्रिकेट क्लबच्या स्पर्धा : रॉयल मराठा संघाला अजिंक्यपद
वारणानगर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विविध भागातून दुबई येथे काम करीत असलेल्या मराठ्यांनी एकत्र येऊन यूएई महाराष्ट्र क्रिकेट क्लब द्वारे आयोजित स्पर्धेत रॉयल मराठा संघाने अजिंक्यपद पटकावत प्रथम क्रमांकाच्या चषकाचा मानकरी ठरला.संयुक्त अरब अमिरातीमध्ये महाराष्ट्रातील मराठी क्रिकेटप्रेमी खेळाडूंची एकमेकांशी क्रिकेटच्या माध्यमातून ओळख व्हावी, आपले क्रिकेट कौशल्य स्पर्धेत दाखविण्याची संधी मिळावी, सुप्त कलागुणांना वाव मिळून ते वृद्धिंगत व्हावेत या उद्देशाने यूएई महाराष्ट्र क्रिकेट क्लब (यूएमसीसी) तर्फे यूएई मधील अजमान विभागात सेव्हन डिस्ट्रिक्ट क्रिकेट मैदानावर टेनिस बॉल एकदिवसीय आयोजीत स्पर्धेत एकूण ८ संघांनी भाग घेतला. महाराष्ट्रातील विविध भागातील खेळाडू वेगवेगळ्या संघातून खेळत होते. मुंबई, नागपूर, पुणे, अहमदनगर, संपूर्ण कोकण, कोल्हापूर, विदर्भ ई. भागातील यूएईमध्ये कामानिमित्त आलेल्या खेळाडूंनी आपले क्रिकेट कौशल्य या स्पर्धेदरम्यान दाखविले.
या स्पर्धेत आम्ही रायगडकर, सिंधू पुत्र, रॉकस्टार्स, मुंबई ११, गणेश क्रिकेट संघ, मराठा किंग्ज, मराठा ईमिरेट्स, रॉयल मराठा, स्वराज्य वॉरियर्स अशा मराठमोळ्या नावाच्या संघांनी भाग घेतला.स्पर्धेत प्रत्येकी १० षटकांचे दोन साखळी सामने, त्यानंतर उपांत्य फेरी आणि शेवटी अंतिम फेरी अशा स्पर्धा पार पडल्या.अंतिम सामना गणेश मित्र मंडळ (डीएमसीसी) विरुद्ध रॉयल मराठा क्रिकेट क्लब दुबई असा खेळला गेला. ज्यात रॉयल मराठा क्रिकेट क्लब ह्या संघाने ५ गडी राखून आपला विजय मिळवला व २०२३ चषक आपल्या नावे केला.
रॉयल मराठा संघाचे व्यवस्थापक श्रीधर दत्ताराम तावडे (शिरगाव देवगड) यांनी उत्तम खेळी बद्दल संघाचे अभिनंदन करून उत्तरोत्तर अशीच कामगिरी बजावण्यास शुभेच्छा दिल्या.रॉयल मराठा संघाचे प्रायोजक आणि कम्युनिटी मेडिकल सेंटर शारजाह च्या मालक डॉ. सौ.निधी सिसोडीया यांनी सहकुटुंब दिवसभर आपली उपस्तिथी दर्शवून संघाचे मनोबल वाढवले.कर्णधार सौरभ गौड (वारणा कोल्हापूर) व उप कर्णधार शाहरुख शेख (रायगड) यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत संघाची साखळी सामने ते अंतिम फेरी पर्यंत लढत कायम ठेवली.
लढती मध्ये सिँहाचा वाट उचलला, तो श्रावण सावंत (गडहींग्लज कोल्हापूर) सर्वोत्कृष्ट गोलंदाज,रिझवान (रायगड) सर्वोत्कृष्ट फलंदाज व अविनाश खोत (कुंभोज कोल्हापूर) मॅन ऑफ द सीरिज यांनी. ह्या खेरीज संघात विकास पाटील, निलेश उंबरकर, विशाल मिस्कीन,सुहास नाईक, सज्जाद पटेल, अनिकेत गौड आणि सलमान अशा खेळाडूंचा समावेश होता.
यूएई तील एकमेव स्वामींनी स्त्रियांचा ढोल ताशा पथक तसेच वैशाली सोनार यांचे लेझीम पथक यांनी स्पर्धेची शोभा वाढवली आणि महाराष्ट्रात असल्याचा भास घडवून आणला. नीरज पाटील (सांगली) यांनी आपल्या उत्तम शैलीने समालोचन केले. विजेत्या रॉयल मराठा क्रिकेट क्लब चे सर्वांनी कौतुक केले.