यू-19 महिला क्रिकेट : भारताचा लंकेवर विजय
वृत्तसंस्था, पुडुचेरी
मंगळवारी येथे झालेल्या 19 वर्षांखालील महिलांच्या पहिल्या अनधिकृत एकदिवशीय सामन्यात भारताने अष्टपैलू खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत श्रीलंकेचा 120 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत, यजमान भारताने सलामीवीर इरा जाधवची प्रभावी खेळी (83) आणि निधी महतोचे अर्धशतक यांच्या जोरावर 8 बाद 279 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजांनी एकत्रित कामगिरी करत श्रीलंकेचा डाव 48.5 षटकांत 159 धावांत गुंडाळला. दिया यादव लवकरच बाद झाल्यानंतर इरा जाधवने 104 चेंडूत संयमी खेळी करत डावाला सावरले आणि फलंदाजीची धुरा सांभाळली. मधल्या षटकांमध्ये तिने उपयुक्त भागीदारी रचल्या, ज्यामुळे भारताचा धावांचा वेग चांगला राहिला. निधीने 51 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले तर कर्णधार अहिरे (42) आणि व्ही. प्रतीक्षा (21) यांच्यासह मधल्या फळीतील फलंदाजांनी शेवटच्या 10 षटकांत धावगती वाढवून संघाची धावसंख्या 280 च्या जवळ पोहोचवली.
श्रीलंकेला हे आव्हान पेलवले नाही. नियमित अंतराने त्यांच्या विकेट्स पडत होत्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 10 षटकांतच तीन बळी टिपले आणि प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला. मनुदी नानायक्काराने संयमी 47 धावांची खेळी करत काहीसा प्रतिकार केला तर लिमांशा थिलकरत्नाने 30 धावा केल्या. मात्र यापैकी कोणालाही चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. आवश्यक धावगती सतत वाढत गेल्याने श्रीलंकेचा डाव कोलमडला.
भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे श्रीलंकेला कोणतीही मोठी भागिदारी करता आली नाही आणि यजमान संघाने सात चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक : यू-19 भारत महिला संघ 50 षटकांत 8 बाद 279 (इरा जाधव 83, निधी महतो 54, चमोधी हेराथ 3-51), श्रीलंका 48.5 षटकांत 159 (मानुदी नानायक्कारा 47, जान्ही विरकर 2-40), महक नरवासे 2-12).