ईश्वर स्मरणाचे प्रकार
अध्याय सहावा
अनेक रूपे धारण करणाऱ्या बाप्पांचे अहर्निश स्मरण करावे, जसा समुद्र नदी, नाले या सर्वांना सामावून घेतो त्याप्रमाणे बाप्पा सर्वांना सामावून घेतात ह्या अर्थाचा अतश्चाहर्निशं भूप स्मर्तव्योऽ नेकरूपवान् । सर्वेषामप्यहं गम्यऽ स्रोतसामर्णवो यथा ।।18।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. बाप्पा सांगतात, ईश्वराचे अहर्निश म्हणजे दिवसरात्र स्मरण करावे म्हणजे अंत्यसमयी त्याची आठवण होईल. त्याचा दुसरा एक फायदा असा होतो की, आपण दु:ख संकटात असताना ईश्वर सतत आपल्या बरोबर आहेत ह्या जाणिवेने मनाला सतत धीर मिळून, आपले मनोधैर्य वाढते आणि दु:ख संकटाची तीव्रता कमी होते.
ईश्वराची अनेक सगुण रूपे आहेत उदाहरणार्थ राम, कृष्ण, दत्त, मारुती, देवी इत्यादि, यापैकी आपल्या आवडत्या दैवताचे स्मरण सतत करावे. ज्याप्रमाणे पावसाचे पाणी कुठेही पडले तरी शेवटी समुद्राला जाऊन मिळते त्यानुसार ईश्वराच्या कुठल्याही सगुण रूपाचे स्मरण केले तरी ते ईश्वराचे स्मरण केल्यासारखेच आहे. वर उल्लेख केलेली व इतर सगुण रूपे ईश्वराने वेळोवेळी भक्त रक्षणासाठी धारण केलेली आहेत पण त्या सर्वांचे स्वसरूप निर्गुण निराकार ईश्वर हेच आहे. स्मरणामागचा मुख्य उद्देश ईश्वराचं स्वसरूप जाणून घेण्याची उत्कटता हे आहे.
सध्याचं आपलं शारीरिक स्वरूप हे आपलं मूळ स्वरूप नसून आपण मूलत: ईश्वराचे अंश आहोत. त्यामुळे त्याचं होऊन राहण्यात आपलं भलं आहे हा बोध होणे गरजेचं आहे. आपण आत्तापर्यंत मी म्हणजे हे शरीर असं समजत होतो, ती चूक दुरुस्त करणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन जे स्मरण केलं जातं त्याला बोधजन्य स्मरण असं म्हणतात. असा बोध झाल्यावर केलेलं स्मरण नित्य निरंतर राहतं, कधीही नष्ट होत नाही कारण हे स्मरण आपल्या नित्य स्वरूपाचे असते. हा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, ज्यांच्याशी मायेच्या प्रभावामुळे भावनिकरित्या आपण गुंतलेलो असतो त्या आपल्या प्रिय व्यक्ती, मुलेबाळे, आईवडील, नातेवाईक हे आपल्याला जवळचे वाटतात. आपण मूळचे ईश्वराच्या कुळातले आहोत याचा आपल्याला विसर पडलेला असल्याने ह्या जन्मातले नाव, गाव, नातेवाईक, आप्त हे तात्पुरते आहेत हे आपल्या लक्षातच येत नाही. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा इतर संबंधित विषय व व्यक्ती मागे पडून ईश्वराचा नित्य संबंध जागृत होतो आणि सतत त्याचे स्मरणही होत राहते. ह्याप्रमाणे संबंधामुळे निर्माण झालेल्या स्मरणाला नित्य स्मरण असं म्हणतात. विविध कर्तव्ये पार पाडत असताना होणारे ईश्वराचे स्मरण हे क्रियाजन्य स्मरण असते. इतर कामात व्यस्त असताना ईश्वराचे स्मरण होणे हे तसे अवघड असते. कारण आपले मन त्या कर्माच्या क्रियेत गुंतलेले असते. म्हणून कर्म करत असताना ईश्वराचे स्मरण करण्याचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाने हे शक्य होते म्हणून याला अभ्यासजन्य स्मरण असे म्हणतात. उदाहरणार्थ चालक गाडी चालवत असताना इकडे तिकडे पहात असेल किंवा कुणाशी तरी बोलतही असेल पण त्याचे लक्ष सदैव रस्त्याकडे असते. ही रस्त्याकडे पाहण्याची सवय त्याने अभ्यासाने लावून घेतलेली असते. त्याप्रमाणे साधकाने इतर कामे करत असताना आपण ईश्वराचे आहोत याचे स्मरण ठेऊन, त्याचे क्रियाजन्य किंवा अभ्यासजन्य स्मरण जरूर करावे. संसाराचे कार्य करत असताना ईश्वराचे स्मरण करण्यात आले तरी ते गौण असते, याउलट ईश्वराचे स्मरण करत संसारिक कार्ये करत गेल्यास संसारिक कार्य गौण होते. म्हणजेच भक्ताने अहर्निश ईश्वराचे स्मरण करत संसारिक कार्ये करावीत. ईश्वराचे स्मरण प्राधान्याने करत असताना आपली कर्तव्यकर्मे करावीत. कामे करत स्मरण करणे किंवा सतत स्मरणात राहून काम करणे या दोन्ही प्रकारात ईश्वर स्मरणाचा आनंद मिळतो.
क्रमश: