माणसाच्या स्वभावाचे प्रकार
अध्याय दहावा
ह्या अध्यायाचे नाव उपदेशयोग असे आहे. ह्या अध्यायामध्ये बाप्पा राजाला माणसांचे तीन प्रकारचे स्वभाव, त्यांची लक्षणे, त्यांच्या वागणुकीमुळं त्यांना मिळणारी फळं इत्यादि विविध गोष्टी सांगून तू दैवी प्रकृतीचा आश्रय कर असे सांगत आहेत. पुढे भक्तांचे तीन प्रकार सांगून त्यांना मिळणाऱ्या भक्तीची फळं सांगतात व शेवटी काम, लोभ, क्रोध आणि दंभ ही नरकाची दारे आहेत, तेव्हा त्यापासून सावध रहा असे सांगत आहेत. अध्यायाची सुरवात करताना बाप्पा म्हणतात,
श्रीगजानन उवाच - दैव्यासुरी राक्षसी च प्रकृतिस्त्रिविधा नृणाम् । तासां फलानि चिन्हानि संक्षेपात्तेऽ धुना ब्रुवे ।। 1 ।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, दैवी, आसुरी आणि राक्षसी अशी तीन प्रकारची मनुष्यांची प्रकृती असते. तिची फळे आणि चिन्हे मी आता संक्षेपाने सांगतो.
विवरण- पूर्वकर्मानुसार माणसाला पुनर्जन्म मिळतो. त्याच्या सध्याच्या जन्मात कुठल्या घटना घडणार आहेत हेही प्रारब्धानुसार ठरलेले असते आणि त्याला अनुकूल असा स्वभाव व वातावरण त्याला मिळते. उदाहरणार्थ पूर्वजन्मात एखाद्याने देवभक्ती केली असेल, योगाभ्यास केला असेल तर त्याचा परिणाम म्हणून त्याची राहिलेली भक्ती वा योगाभ्यास पूर्ण व्हावा, यादृष्टीने त्याला त्यासाठी अनुकूल स्वभाव या जन्मात मिळतो व अनुकूल वातावरण असलेल्या घराण्यात त्याचा पुनर्जन्म होतो. हे त्याने पूर्वी आत्मोद्धाराच्या दृष्टीने केलेले कार्य पुढे चालू रहावे यादृष्टीने मिळालेले फळ असते. थोडक्यात त्याची मागील जन्मातील भक्ती अथवा योगाभ्यास वाया न जाता तो पूर्णत्वाला जावा या उद्देशाने केलेली ईश्वरी योजना असते. याउलट ज्याने गेल्या जन्मात काही दुष्कृत्ये केलेली असतात त्याचे फळ म्हणून त्याचा जन्म तशा प्रकारची कर्मे करणाऱ्या कुळात होतो आणि त्याला अनुकूल असा स्वभाव व वातावरण त्याला मिळते. यामुळे त्याच्या दृष्कृत्यात भर पडून त्याची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी होऊ शकते!
वरील सर्व विवेचनावरून माणसांचे स्वभाव वेगवेगळे का असतात हे लक्षात येतं. समोरच्या माणसाच्या स्वभावावरून त्यानं गतजन्मात काय केलं असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. काही मुलांना लहानपणीच गीता पाठ असते, काहींना प्रचंड बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेले असतं, त्यायोगे ते मोठमोठी गणिते सहजी सोडवू शकतात, काहींना एखाद्या कलेत जन्मजात प्राविण्य मिळालेले असते. हे सर्व त्यांच्या आत्म्यावर पूर्वजन्मी झालेल्या संस्कारामुळे शक्य होत असते. याउलट काही लहानपणीच गुन्हेगारी जगताकडे वळतात, काही वंश परंपरागत दुर्धर आजाराचा सामना करत असतात. हीही त्यांच्या पूर्वकृत्याचीच फळे असतात.
पूर्वकर्मानुसार माणसाला दैवी, आसुरी किंवा राक्षसी या तीनपैकी एकप्रकारचा स्वभाव माणसाला लाभतो. तो जन्मजात असल्याने सहसा बदलत नाही. सत्वगुणापासून दैवी, रजोगुणापासून आसुरी व तमोगुणापासून राक्षसी वृत्ती किंवा स्वभाव तयार होतो. त्या स्वभावाला पोषक असे प्रसंग त्या त्या व्यक्तीच्या जीवनात घडणार असतात आणि ते अटळ असतात. माणसाला मिळणारा स्वभाव व जीवनात येणारे प्रसंग बदलता येत नाहीत पण त्या त्या प्रसंगात कसं वागायचं हे मात्र तो ठरवू शकतो. इथं त्याच्या आत्म्यावर पूर्वजन्मी झालेले व सध्याच्या आईवडिलांनी केलेले संस्कार उपयोगी येतात. हे संस्कारच, माणसातील आसुरी किंवा राक्षसी प्रवृत्तीचे नियंत्रण करून तिला मर्यादित ठेवतात व सात्विकतेचा प्रभाव वाढवतात. अर्थात हे मोठे आव्हानात्मक काम आहे कारण संस्कार जरी योग्य काय अयोग्य काय सांगत असले तरी, त्यातील योग्य निर्णयाची निवड करून पुढे जायचे धाडस स्वत:च करावे लागते.
क्रमश: