For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटारसायकलवर झाड कोसळून दोन तरुण ठार

11:35 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोटारसायकलवर झाड कोसळून दोन तरुण ठार
Advertisement

कर्ले येथील तरुणांवर काळाचा घाला : बेळगुंदीजवळ दुर्घटना, आणखी एक तरुण गंभीर जखमी 

Advertisement

बेळगाव : धावत्या मोटारसायकलवर रस्त्याशेजारील झाड कोसळून कर्ले, ता. बेळगाव येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास बेळगुंदीजवळ ही घटना घडली असून या अपघातात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोन तरुणांच्या अपघाती मृत्युमुळे कर्ले गावावर शोककळा पसरली आहे. सोमनाथ राहुल मुचंडीकर (वय 21) रा. विठ्ठल-रखुमाई गल्ली, कर्ले, विठ्ठल कृष्णा तळवार (वय 16) रा. नाईक गल्ली, कर्ले अशी त्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. स्वप्नील सुनील देसाई (वय 18) हा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

रविवार दि. 9 जून रोजी सकाळी केए 22, एचजी 7594 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून सोमनाथ, स्वप्नील व विठ्ठल हे बिजगर्णीहून बेळगुंदीकडे जात होते. त्यावेळी बेळगुंदी स्मशानभूमीजवळ रस्त्याशेजारी असलेले एक झाड धावत्या मोटारसायकलवर कोसळून हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सिव्हिलला पोहोचण्याआधीच सोमनाथचा मृत्यू झाला तर रविवारी सायंकाळी उपचारांचा उपयोग न होता विठ्ठल दगावला. सोमनाथ हा गवंडीकाम करीत होता. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे तर विठ्ठलच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी सोमनाथच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर रात्री उशिरापर्यंत विठ्ठलच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नचिकेत जनगौडा, पोलीस उपनिरीक्षक श्वेता व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. सोमनाथची आई गीता मुचंडीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

कामावर जाताना झाड कोसळले

मोटारसायकलवरून कर्ले येथील तीन तरुण रविवारी कामावर जात होते. त्यावेळी बेळगुंदीजवळ रस्त्याशेजारील झाड उन्मळून धावत्या मोटारसायकलवर पडल्याने ही घटना घडली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वारा आणि पावसामुळे हे झाड मुळासकट उन्मळून पडले. या घटनेत दोन तरुणांचा बळी गेला आहे. शवागाराच्या आवारात कुटुंबीयांचा एकच आक्रोश सुरू होता.

Advertisement
Tags :

.