कॅम्प पोलीस स्थानकावर दोघा तरुणांकडून दगडफेक
समज देण्यासाठी बोलावल्याच्या रागातून कृत्य
प्रतिनिधी/ बेळगाव
समज देण्यासाठी पोलीस स्थानकात बोलाविण्यात आलेल्या दोघा तरुणांनी पोलीस स्थानकावर दगडफेक करून पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याची घटना शुक्रवारी रात्री कॅम्प पोलीस स्थानकात घडली आहे. यासंबंधी एका अल्पवयीनासह दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जस्टीन झेवियर स्टीवन (वय 20) रा. अँथोनी स्ट्रीट, कॅम्प व आणखी एका अल्पवयीनावर कॅम्प पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता कलम 121 (2), 123, 152, 351(2),(3), 3(5) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला पुढील तपास करीत आहेत.
जस्टीन व त्याचा भाऊ कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या खून प्रकरणात संशयित आरोपी आहेत. अँथोनी स्ट्रीट येथील स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून समज देण्यासाठी जस्टीनला पोलीस स्थानकात बोलाविण्यात आले होते. रात्री परिसरात दादागिरी थांबवा, अशी समज देताना या भावंडांनी उलट पोलीस अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
निर्वाणेप्पा शिरुर या पोलिसाला व इतर पोलिसांना शिवीगाळ करीत धमकाविण्यास सुरुवात केली. त्यावेळी जस्टीनच्या भावाने रात्री पोलीस स्थानकावर दगडफेक केली. जस्टीननेही निर्वाणेप्पा या पोलिसाच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे