मोले अपघातात दोघे युवक ठार
बंद पडलेल्या ट्रकला मागून दिली धडक : सुट्टी असल्याने गोव्यातून जात होते कर्नाटकात
धारबांदोडा : नंद्रण-मोले येथे गोवा-बेळगाव महामार्गावर नादुरुस्त होऊन बंद पडलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने त्यात कर्नाटक राज्यातील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. काल रविवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. राजेश टी. देसाई (25 रा. जोयडा) व निखील मडीवाल (24 रा. हल्याळ) अशी या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. दोघेही युवक गोव्यातील एका खासगी कंपनीमध्ये कामाला होते. दोन दिवस सुट्टी असल्याने ते दोघेही रविवारी पहाटे गावाकडे जायला निघाले असता, वाटेत हा अपघात झाला.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केए 28 सी 9946 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक बेळगावच्या दिशेने जात असताना पहाटे 4 वा. सुमारास नंद्रण-मोले येथे नादुरुस्त होऊन रस्तावरच बंद पडला होता. राजेश व निखिल हे दोघेही जीए 04 के 1310 या क्रमांकाच्या यामाहा मोटारसायकलवरुन घरी निघाले होते. रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. त्यात राजेश हा जागीच ठार झाला तर निखिल याला गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दोघेही युवक विवाहित होते. या घटनेसंबंधी कुळे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. कुळे पोलिसस्थानकाचे हवालदार भैरु झोरे यांनी अपघाताचा पंचनामा केला. निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विभावरी गावकर या पुढील तपास करीत आहेत.