महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेत दोन युवकांची घुसखोरी

06:58 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रेक्षकांमधून मारल्या उड्या, पिवळा धूर सोडला, सुरक्षा सैनिकांकडून अटक, सभागृहाबाहेरही दोघे ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

संसदेवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी पुन्हा एकदा संसदेची सुरक्षा तोडण्याचा प्रकार घडला आहे. लोकसभेचे कामकाज होत असताना, प्रेक्षागारात बसलेल्या दोन तरुणांनी सभागृहात उड्या मारल्या आणि स्वत:जवळ असणाऱ्या नळकांड्यांमधून पिवळा धूर सोडला. यामुळे काहीकाळ प्रचंड गोंधळ उडाला. या तरुणांनी मागच्या बाजूला असणाऱ्या खासदारांच्या बाकांवरुन उड्या मारल्या. नंतर काही खासदारांनी त्यांना पकडले. तोपर्यंत सुरक्षा रक्षकांनी सदनात प्रवेश करुन त्यांना ताब्यात घेतले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. संसदेबाहेरच्या दोघांपैकी एकजण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असून त्याचे नाव अमोल शिंदे असल्याची माहिती प्राथमिक तपासानंतर देण्यात आली आहे. संसदेत घुसलेल्या युवकांची नावे सागर शर्मा आणि मनोरंजन अशी आहेत. हे व्यापक कटकारस्थानच आहे, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल, असे नंतर स्पष्ट केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर सर्व खासदार सभागृहातून बाहेर पडले. तसेच पीठासीन अध्यक्षांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित केले. 2 वाजता कामकाजाला पुन्हा प्रारंभ झाला. त्यावेळी बिर्ला यांनी निवेदन दिले. हा संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेवर मोठा आघात असून सरकारने संसदेची सुरक्षा सांभाळण्यात मोठी कुचराई केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.

नेमका काय प्रकार घडला ?

बुधवारी सकाळी लोकसभेत प्रश्नोत्तरांचा तास घेण्यात येत असताना प्रेक्षागारात बसलेला एक तरुण खांबावरुन उतरुन लोकसभेच्या सदनाच्या मागच्या भागात प्रवेशला. त्यानंतर दुसऱ्या एका तरुणाने प्रेक्षागारातून सदनात उडी मारली. त्यांनी खासदारांच्या बाकांवरुन पळापळी करण्यास प्रारंभ केला. तसेच, ‘तानाशाही नही चलेगी,’ ‘भारत माता की जय’ आणि ‘जय भीम, जय भारत’ अशा घोषणा दिल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी खासदारांनी दिली आहे. या तरुणांना काही खासदारांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले आणि धरुन ठेवले. तथापि, ते पकडले जाण्याअगोदर त्यांनी स्वत:जवळ असलेल्या धुराच्या नळकांड्या खोलल्या. त्यामुळे पिवळ्या रंगाचा धूर पसरला. परिणामी उपस्थित खासदारांमध्ये घबराट उडाली.

घुसखोरांना खासदारांकडून चोप

पडलेल्या युवकांना खासदारांनी चांगलाच चोप दिला. हा प्रकार घडत असतानाच सुरक्षा रक्षकांनी सभागृहात प्रवेश केला आणि त्वरित या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची सभागृहाबाहेर उचलबांगडी करण्यात आली. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे. या युवकांचा कोणत्या संघटनेशी किंवा दहशतवादाशी संबंध आहे काय, याची तपासणी करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाणवत नसले, तरी सर्व शक्यता गृहित धरुन तपास करण्यात येणार आहे.

सभागृहाबाहेरही दोघांना अटक

संसद परिसरात, पण सभागृहांच्या बाहेर याचवेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांच्यामध्ये एक महिला असून तिचे नाव नीलम सिंग असल्याचे प्राथमिक तपासात समजले आहे. हे दोघे संसदेच्या बाहेर घोषणा देत होते. तसेच त्यांच्याकडेही धुराची नळकांडी सापडली आहेत. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. नंतर सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा अध्यक्षांचे निवेदन

या घटनेनंतर दुपारी दोन वाजता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती देणारे निवेदन सभागृहात आहे. हा प्रकार गंभीर असून त्याची पाळेमुळे खणून काढण्यात येतील. खासदारांनी या प्रकारासंबंधी संतप्त भावना व्यक्त केल्या असून मी त्यांच्याशी सहमत आहे. सापडलेल्या युवकांची सखोल चौकशी करुन या प्रकरणातील सत्य त्वरित बाहेर काढण्यात येईल. या युवकांचा कोणाशी संबंध आहे आणि ते कोणाचे हस्तक म्हणून काम करीत आहेत का, याचीही पडताळणी केली जाईल, असे आश्वासन ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या सदस्यांना दिले. लोकसभेचा अध्यक्ष या नात्याने हे माझे उत्तरदायित्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेतही गोंधळ

लोकसभेत झालेल्या या भीषण प्रकाराचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. राज्यसभेचे कामकाज त्वरित स्थगित करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तसेच सरकारने त्वरित तपास करुन झाल्या प्रकारासंबंधी सविस्तर निवेदन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

या सर्व प्रकारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पिवळा धूर सोडला जाणे, ही मानण्यात येत आहे. हा धूर कसला होता, याची माहिती ओम बिर्ला यांनी नंतर दिली आहे. हा धूर साध्या धुरासारखाच असून तो विषारी नव्हता असे तपासात निष्पन्न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर आणखी तपास होत आहे. त्यांच्या या माहितीमुळे खासदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

प्रवेश कसा मिळाला ?

प्रथम संसद परिसरात आणि नंतर लोकसभेच्या गृहात या तरुणांना प्रवेश कसा मिळाला, यावर आता चर्चा सुरु आहे. विरोधकांकडून सरकारला जाब विचारण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार लोकसभेत घुसलेल्या दोन तरुणांपैकी एकाने म्हैसूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रतापसिंग यांच्या नावे प्रवेशपत्र मिळविले होते. असे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी आता केली जात आहे. त्यांच्या म्हैसूरच्या निवासस्थानी आयबीचे अधिकारी पोहचले आहेत.

प्रवेशपत्रे देण्यावर बंदी

संसदेत घुसलेल्या तरुणांनी ई-पास मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ई-पास देण्याची प्रक्रिया बंद करण्याचा आदेश लोकसभेच्या अध्यक्षांनी काढला आहे. प्रेक्षागारातून कामकाज बघण्याची मुभा सर्वसामान्य नागरिकांना देणे आता बंद करावे, अशी मागणीही केली जात आहे.

*

सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर विचार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी दुपारी चार वाजता केले होते. या बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संसदेच्या सुरक्षेसंबंधी अनेक प्रतिनिधींनी सरकारला सूचना केल्याचे समजते. लोकांना संसदेचे कामकाज प्रत्यक्ष बघण्याची सोय आता बंद करावी. कारण संसदेच्या कामकाजाचे थेट व्हिडीओ प्रक्षेपण केले जात असल्याने कोणीही बाहेरुन कामकाज पाहू शकतो. प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही, अशी सूचना अनेक तज्ञांनीही आता केली आहे. तसेच आत येणाऱ्या प्रत्येकाची कसून शारिरीक तपासणी केली जावी, अशीही सूचना अनेक खासदारांनी या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युवकांचे नक्षली कनेक्शन ?

लोकसभेत घुसलेले युवक नक्षली विचारांनी भारलेले असून त्यांचे नक्षली संघटनांशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या शक्यतेला अद्याप तपास अधिकाऱ्यांचा दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयोगाची नियुक्ती करावी, तसेच यामागे एखादे व्यापक कटकारस्थान आहे का याचीही कसून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. एखादा मोठा हल्ला संसदेवर करण्याची ही ‘रंगीत तालीम’ आहे काय, याचाही शोध घेतला जावा, अशी मागणी अनेक संसदसदस्यांनी केली आहे.

वाढीव सुरक्षा दले नियुक्त

या प्रकारानंतर त्वरित संसद भवन परिसरात सुरक्षा रक्षकांच्या तुकड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच तपासणीही अधिक कठोरपणे केली जावी, याची व्यवस्था करण्यात आली आहे. संसदेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा सैनिक नियुक्त करण्यात आले असून झाल्या प्रकाराची धास्ती कोणी घेऊ नये. असा प्रकार पुन्हा घडणार नाही, ही दक्षता घेण्यात येईल, असे संसद सुरक्षा व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

खासदारांच्या प्रतिक्रिया

लोकसभेत कामकाज होत असताना घडलेल्या या घटनेचे खासदारांमध्येही तीव्र पडसाद उमटले आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचे स्पष्ट केले. आत घुसलेला एक युवक घोषणा देताना आणि बाकांवरुन पळापळी करताना आपण पाहिल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी भाजपचे राजेंद्र अग्रवाल पीठासीन अध्यक्ष होते. त्यांनीही हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. या युवकांनी ज्या खासदारांनी पकडले, त्यांनीही महिती दिली आहे. हे युवक आम्ही देशभक्तच आहोत, केवळ आम्ही निषेध करण्यासाठी आलो आहोत, असे म्हणत असल्याचे या खासदारांनी स्पष्ट केले. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी युवकांनी आपल्या बुटातून धुराची नळकांडी काढत असताना पाहिल्याचे स्पष्ट केले. घुसखोर युवक सभाध्यक्षांच्या आसनाकडे धावत होते. तथापि, त्यांना वाटेतच पकडण्यात आले, अशीही माहिती अनेक प्रत्यक्षदर्शी खासदारांनी दिली आहे. घडलेला सारा प्रकार लोकसभेच्या व्हिडीओ कॅमेऱ्यांमध्ये टिपला गेला आहे.

6 जणांचे कारस्थान

आतापर्यंत झालेल्या तपासातून हे कारस्थानच असून त्यात सहा जणांचा सहभाग आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यापैकी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून सहाव्याचा शोध सुरु आहे. सहाव्याचे नाव ललित असे असून तो उरलेल्या पाच जणांचे मोबाईल घेऊन पळून गेल्याची माहिती देण्यात आली. त्याला पकडण्यासाठी पोलिस पथके विविध भागांमध्ये धाडण्यात आली असून सर्वांचे मोबाईल सापडल्यानंतर या कारस्थानावर प्रकाश पडणार आहे.

एकत्र ठरविली योजना

सर्व सहा आरोपींनी एकत्र येऊन योजना ठरविली. दिल्लीत येण्यापूर्वी त्यांचे वास्तव्य गुरुग्राम या हरियाणातील शहरात होते. तेथे त्यांची राहण्याची व्यवस्था ललित नामक युवकाने केली होती. सर्व आरोपी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र आल्याचेही स्पष्ट झाले. त्यांची योजना प्रतिकात्मक विरोध करण्याची होती, असे त्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांमध्ये अधिक माहिती मिळणार आहे.

नीलम शेतकरी आंदोलनात

संसदेबाहेर पकडण्यात आलेली नीलम सिंग ही दिल्लीला वेढा देणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. तिला सोडण्याची मागणी काही शेतकरी नेत्यांनी केली आहे. संसदेत पकडला गेलेला आरोपी सागर शर्मा हा लखनौ येथे इलेक्ट्रिक रिक्षाचालक आहे. नीलम ही हरियाणातील हिस्सार येथील असून ती नागरी सेवा परीक्षांची तयारी करीत होती, असे समजते. अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा असून तोही सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सर्वात मोठा प्रश्न संसदसुरक्षेचा

सहा आरोपींसंबंधी माहिती नंतर स्पष्ट होणार आहे. पण सर्वात मोठा प्रश्न संसदेच्या सुरक्षेचा आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले. संसदेत सहजासहजी कोणालाही प्रवेश मिळत नाही. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तेथे आहे. खासदार, अधिकारी आणि कर्मचारी यांचीही कसून तपासणी होते. अशा स्थितीत दोन युवक आतपर्यंत कसे घुसले, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यांच्याकडे कोणतेही ओळखता शस्त्र नव्हते. त्यामुळे ते सहजगत्या आत जाऊ शकले. धुराणी नळकांडी त्यांनी बुटात लपविली असल्याने ते सुरक्षा व्यवस्था पार करु शकले, असेही काही जणांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेसाठी कोणत्या प्रकारे सतर्क रहावे लागणार आहे, याची झलक पहावयास मिळाली असून सरकारने सतर्क रहावयास हवे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

लोकसभेत काय घडले ?

ड दुपारी एक वाजता शून्य प्रहरात दोन युवकांचा सदनात प्रवेश

ड दोन्ही युवक प्रेक्षागारात उपस्थित होते. खांबावरुन उतरुन प्रवेश

ड एक युवकाची खासदारांच्या बाकांवरुन पळापळी, पकडण्यात यश

ड खासदारांनी दिला युवकाला चोप, नंतर सुरक्षा रक्षकांनी पकडले

ड संसद सदनाबाहेर घोषणाबाजी करणारे दोन जण पोलिसांच्या हाती

ड संपूर्ण प्रकारात कोणीही जखमी नाही, सखोल चौकशीला प्रारंभ

ड व्यापक कटकारस्थानाचा भाग असल्याची शक्यता धरुन तपास

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article