दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू
निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर चिंचणी टोलनाक्याजवळ घटना
त. भा. प्रतिनिधी
चिकोडी : निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर चिंचणी टोलनाक्याजवळ दुचाकीने पुढे जाणाऱ्या ट्रकला (लॉरी) पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चिकोडीतील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. 27) घडली.
कामावरून घरी परतत असताना अचानक काळाने घाला घातल्याने चिकोडी शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातात जागीच मृत्यू झालेल्या तरुणांची नावेसिद्धू कुरळे (वय 23, रा. होसपेट गल्ली, चिकोडी, स्वरूप माळुदे (वय 24, रा. होसपेट गल्ली, चिकोडी)
अशी आहेत. सिद्धू कुरळे आणि स्वरूप माळुदे हे दोघे तरुण निपाणी येथे आपले काम आटोपून शनिवारी दुचाकीवरून चिकोडीकडे आपल्या घरी परतत होते. त्यांची दुचाकी चिंचणी टोलनाक्याजवळ आली असता, पुढे जाणाऱ्या एका ट्रकचा (लॉरीचा) अंदाज त्यांना आला नाही.दुचाकीचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीने थेट ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुण रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाले आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच करुण अंत झाला.
अपघाताची माहिती मिळताच चिकोडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिले. याप्रकरणी चिकोडी वाहतूक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऐन तारुण्यात दोन तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने होसपेट गल्लीसह संपूर्ण चिकोडी शहरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.