संसदेमध्ये दोघा तरूणांची घुसखोरी; प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेऊन पसरवले धुराचे लोट; संसद सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
संसदेवरील हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असताना हिवाळी अधिवेशनामध्ये दोन तरूणांनी आत घुसुन पिवळ्या धुराचे लोट पसरवले. त्यामुळे लोकसभेच्या कामकाजामध्ये अडथळा येऊन एकच गोंधळ निर्माण झाला. पोलीसांनी दोघा तरूणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यासंबंधी माहीती देताना दोघांचीही पोलीसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
संसदेवरील हल्ल्याचा आज स्मृतीदिन असताना आज पुन्हा संसदेच्या सुरक्षा भेदली गेली. दोन तरूणांनी खासदार पासेस मिळवून प्रेक्षक गॅलरीत प्रवेश मिळवला. लोकसभेचे कामकाज चालु असताना दोन्ही तरूणांनी गॅलरीतून खाली उडी मारली. आणि पिवळ्या धुराचे लोट पसरवले.
तरुणांनी केलेल्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे कामकाजात एकच कल्लोळ माजला. काही खासदारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करून त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर लोकसभेतील कामकाज खांबवण्यात आल्याने खासदार बाहेर पडले. काही वेळानं ते पुन्हा सुरु करण्यात आलं.
याबाबतची माहीती देताना ओम बिर्ला म्हणाले, "लोकसभेत शून्य प्रहरात जी घटना घडली होती. त्याबाबत आपल्या सगळ्यांनाच चिंता होती आणि आहे. लोकसभा या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी करत असून या संदर्भात दिल्ली पोलिसांनाही आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपल्या सगळ्यांना जी चिंता वाटत होती की ज्या धुराचे लोट पसरवण्यात आले तो धूर नेमका काय होता? प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की तो धूर सर्वसाधारण धुराप्रमाणेच होता. फक्त काहीतरी गदारोळ घडला पाहिजे या उद्देशाने या धुराचे लोट पसरवले गेले. तो धूर हा चिंतेचा विषय नाही, प्राथमिक चौकशीच्या नंतरच मी हे आपणाला सांगतो आहे.” असं ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं.