चन्नम्मा चौकात दोघा तरुणांवर दगडाने हल्ला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीत मारामारी
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध दलित संघटनांच्या वतीने सोमवारी सायंकाळी शहरात चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मिरवणुकीला काही अतिउत्साही तरुणाकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. रात्री 9.45 च्या दरम्यान चन्नम्मा चौकात तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. डोक्यात दगडाने हल्ला करण्यात आल्याने दोघे तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. हाणामारीच्या घटनेमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
उमेश लमाणी आणि शिवराज केरीगार, दोघे राहणार मुरगोड अशी जखमींची नावे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी संभाजी चौकातून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक किर्लोस्कर रोड मार्गे चन्नम्मा सर्कल येथे आली. विविध चित्ररथ मिरवणुकीमध्ये लावण्यात आलेल्या डॉल्बीच्या आवाजावर तरुण थिरकत होते. रात्री 9.45 च्या दरम्यान चन्नम्मा चौकात तरुणामध्ये नाचण्यावरून वादावादी झाली.
वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी काही तरुणांनी वरील दोघांवर दगडाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर काहीवेळ चन्नम्मा चौकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. उपचारानंतर दोघाही तरुणांना घरी जाऊ देण्यात आले. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.