For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादमधून दोन तरुणांना घेतले ताब्यात

01:19 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादमधून दोन तरुणांना घेतले ताब्यात
Advertisement

टिळकवाडीतील डिजिटल अरेस्ट प्रकरण : दोघांच्या बँक खात्यांवर 2 कोटींचा व्यवहार

Advertisement

बेळगाव : आगरकर रोड, टिळकवाडी येथील एका वृद्ध उद्योजकाला डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या खात्यातून 15 कोटी 45 लाख रुपये हडप केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागातील अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या बँक खात्यांवर 2 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सायबर क्राईम विभागाचे एसीपी बी. एस. मंटूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, पोलीस उपनिरीक्षक सुमन पवार, के. व्ही. चरलिंगमठ, एन. जे. मादर, व्ही. एन. बडवण्णावर, यासीन नदाफ, एम. ए. हिंडी आदींचा समावेश असलेल्या पथकाने 6 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये दोघा जणांना अटक केली आहे.

वेंकदूत शरत नाईक (वय 24) राहणार गच्चीबोली हॉस्टेल, हैदराबाद,देगावत श्रीपाद नाईक (वय 25) राहणार शिवदुर्गनगर, चंगीचोर्ला, हैदराबाद (तेलंगणा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. हे दोघे एमबीए व बी.टेक्चे पदवीधर आहेत. या दोन तरुणांच्या नावे उघडण्यात आलेल्या म्यूल खात्यावर उलाढाल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आगरकर रोड, टिळकवाडी येथील अजित गोपालकृष्ण सराफ (वय 81) यांनी 18 मार्च 2026 रोजी सायबर क्राईम विभागात आपल्याला झालेल्या डिजिटल अरेस्टसंबंधी एफआयआर दाखल केला होता. सीबीआयचे अधिकारी के. सुब्रमण्यम असल्याचे सांगत जेट एअरवेज कंपनीचे सीईओ नरेश गोयल यांच्या संपर्कात तुम्ही आहात, मनी लँड्रींगमध्ये तुम्ही 5 लाख रुपये कमिशन घेतला आहात, त्यामुळे या प्रकरणात तुम्हीही आरोपी आहात, चौकशीसाठी सहकार्य करा, नहून तुम्हाला अटक केली जाईल, अशी धमकी देत 15 कोटी 45 लाख रुपयांना त्यांना लुटण्यात आले होते.

Advertisement

5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता त्यांना फोन कॉल आला होता. 7 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 यावेळेत या वृद्ध उद्योजकाने सायबर गुन्हेगारांच्या बँक खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून मोठी रक्कम जमा केली होती. यासंबंधीचा एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास हाती घेतला असता हैदराबाद येथील वेंकदूत शरत नाईक व देगावत श्रीपाद नाईक या दोन तरुणांच्या बँक खात्यांवर 9 फेब्रुवारी रोजी वृद्ध उद्योजकाने आरटीजीएसच्या माध्यमातून पाठवलेली 2 कोटींची रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले. इंडस इंड बँकेतील करंट खात्यात रक्कम जमा झाली होती. त्यामुळे सायबर क्राईम विभागातील अधिकाऱ्यांनी या दोन तरुणांना अटक करून मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व पोलिसांचे कौतुक केले आहे.

सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे मोठे आव्हान

हैदराबाद येथे अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांना स्वतंत्र फर्म तयार करायची आहे, यासाठी खाती उघडून द्या. तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे सांगत त्यांच्या बँक खात्यात डिजिटल अरेस्ट व इतर सायबर गुन्ह्यातून मिळालेली रक्कम जमा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा संपूर्ण व्यवहार परदेशात बसून सायबर गुन्हेगारांनी केला असून सध्या केवळ म्यूल खातेधारकांना अटक झाली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान सायबर क्राईम विभागासमोर उभे ठाकले आहे.

पदवीपूर्व जिल्हाशिक्षणाधिकारी एम. एम. कांबळे यांचा मोबाईल हॅक

पदवीपूर्व विभागाचे जिल्हाशिक्षणाधिकारी एम. एम. कांबळे यांचा मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या नावे लग्नपत्रिकेतून एपीके फाईल पाठविली आहे. त्यांच्या संपर्कातील अनेकांना बुधवारी सकाळपासूनच वेडिंग कार्ड एपीके फाईल पाठविण्यात आली आहे. एम. एम. कांबळे यांच्या संपर्कातील प्राध्यापक, पत्रकार, नातेवाईक आदी अनेकांना एपीके फाईल पाठवून फसविण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंबंधी त्यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली आहे.

महिला अधिकाऱ्याचे दोन लाख रुपये हडप

गेल्या आठवड्यात बेळवडी तालुका बैलहोंगल येथील एका महिला अधिकाऱ्याला लग्नपत्रिकेच्या माध्यमातून एपीके फाईल पाठवून दोन लाख रुपये हडप करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच जिल्हा पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Advertisement
Tags :

.