अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघा तरुणांना अटक
विटा :
लग्नाला नकार दिला म्हणून जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार खानापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश रविंद्र वाघमारे (वय २२), सोमनाथ जालिंदर आवळे (वय २९, दोघेही रा. विटा), शरद आणि दिलीप (पूर्ण नाव व पत्ता नाही) या चौघांवर विटा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश वाघमारे आणि सोमनाथ आवळे यांना अटक केली आहे. त्यांना सोमवारी ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
गणेश वाघमारे याने त्याचे घरी पीडितचे सोबत इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आहेत. तसेच संशयित गणेश वाघमारे याने संबंधित अल्पवयीन मुलीला जर तू माझ्या सोबत घरी आली नाहीस, तर तुझ्या घरातील लोकांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यावर ती घाबरुन गणेशच्या घरी गेली. त्यावेळी संशयित गणेश याने पुन्हा इच्छेविरुद्ध जबरदस्ती केली. त्यानंतर वर्षभर हा प्रकार तो करीत राहिला. त्यानंतर २० जून रोजी पीडिता आणि तिची धाकटी बहीण ह्या शेताकडे निघाल्या असता गणेशचा मित्र संशयित सोमनाथ आवळे हा आला. त्याने त्याची गाडी थांबवून तुम्हाला रानात सोडतो, असे म्हणून पीडित अल्पवयीन मुलगी आणि लहान बहिणीला त्याच्या गाडीवर बसवून माहुली व चिखलहोळ (ता. खानापूर) येथील माळावर घेवून गेला. तिथे त्याने संशयित शरद आणि दिलीप यांना फोन करुन माळावर बोलावून घेतले. त्यानंतर सोमनाथने मी तुझ्याशी लग्र करेन, असे म्हणाला. मात्र संबंधित मुलीने त्यास नकार दिला असता शरद आणि दिलीप यांनी तिचा विनयभंग केला आणि पळून गेले. तर सोमनाथ याने इच्छेविरुध्द जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध करुन त्यांना माळावरच सोडून निघून गेला. याप्रकरणी गणेश वाघमारे आणि सोमनाथ आवळे यांना अटक करण्यात आली आहे.