युक्रेन -रशिया युद्धाला दोन वर्षे पूर्ण
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला शनिवारी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण करुन तो देश आपल्याला जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेननेही रशियाचा प्रतिकार केला होता. त्यामुळे मोठ्या युद्धाला तोंड फुटले होते. हे युद्ध अद्यापही होत असून कोणाचाही निर्णायक विजय आतापर्यंत झालेला नाही, असे दिसून येत आहे.
या युद्धाला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने अनेक युरोपियन देशांचे प्रमुख शनिवारी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये जमले होते. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सला व्हॉन डर लियेन या शुक्रवारी रात्रीच कीव्हला पोहचल्या होत्या. शुक्रवारी रात्रीच रशियाने दक्षिण युक्रेनच्या ओडेसा या शहरावर ड्रोनने मोठा हल्ला चढविला होता. तथापि, त्याला दाद न देता युक्रेनमध्ये अनेक देशांचे नेते आलेले आहेत.
ठाम पाठिंबा
युव्रेनने गेली दोन वर्षे रशियासारख्या बलाढ्या राष्ट्राशी दोन हात केले आहेत. यासाठी आम्ही या देशाची जनता आणि प्रशासन यांची प्रशंसा करतो. तसेच हे युद्ध कितीही काळ लांबले तरी युक्रेनला आमचा पाठिंबा आणि साहाय्य नेहमीच मिळत राहील. युक्रेनवर अन्याय झाला असून युरोपियन देश त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे प्रतिपादन या नेत्यांनी केले आहे.