ड्रायव्हिंग लायसनला दोन वर्षांची मुदतवाढ
वाहतूकमंत्री गुदिन्हो यांना केंद्रीय मंत्री गडकरींचे आश्वासन
पणजी : ड्रायव्हिंग लायसनचा परवाना संपुष्टात आल्यानंतरही आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची तरतूद लवकरच केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना दिले आहे. त्याचबरोबर गोव्यात वाहतूक प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील, असेही गडकरींनी स्पष्ट केले. गडकरी हे 21 जानेवारी रोजी गोव्यात येणार असून त्यांच्या हस्ते मुरगाव हार्बर ते वास्को दरम्यान उड्डाणपुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. गोव्याच्या अनेक सूचना, प्रस्ताव देशातील वाहतूकमंत्र्यांची राष्ट्रीय बैठक काल मंगळवारी नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी मंत्री गुदिन्हो गेले आहेत. बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यातील बहुतांश सूचनांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले आणि त्याबाबतचे गोव्याचे प्रस्ताव त्यांनी स्वीकारले.
दोन वर्षांची मुदतवाढ हवी
ज्या व्यक्तींचा वाहतूक परवाना संपुष्टात आलेला आहे तो पुनऊज्जीवीत करण्यासाठी एक वर्षाची मुदत सध्या आहे. ही मुदत फारच अल्प असल्याने दोन वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी गुदिन्हो यांनी केली होती, ती गडकरी यांनी मान्य केली. त्या अनुषंगाने वाहतूक कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील, असे आश्वासन दिले.
महामंडळांबाबतचा प्रस्ताव मान्य
बैठकीनंतर दै. तऊण भारतशी बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की सदर बैठक फार यशस्वी झाली. देशभरातील वाहतूकमंत्री हजर होते. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना गुंतवणूक करण्याची संधी द्यावी, जेणेकरून देशभरातील राज्यांतील वाहतूक महामंडळे जी सध्या तोट्यात चालतात त्यांना आर्थिक हातभार मिळणार आहे. कमी व्याजदरात आर्थिक तरतूद झाल्याने या महामंडळांचा तोटा कमी होईल आणि महामंडळे मजबूतपणे चालतील. हा प्रस्ताव मंत्री गडकरी यांना मान्य झाला. लवकरच त्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.