दगडखाणीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू
ओडिशातील धेंकानाल येथील दुर्घटना : मदत-बचावकार्याला वेग
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशातील धेंकानाल जिह्यातील एका बेकायदेशीर दगडखाणीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले. अजूनही काही कामगार अडकण्याची शक्यता गृहीत धरून मदत व बचावकार्य सुरू ठेवण्यात आले होते. मोटांगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गोपालपूरजवळ हा स्फोट झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत अधिकृतपणे कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु या घटनेमुळे परिसरात घबराट आणि प्रशासकीय चिंता वाढली होती. अखेरीस दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दगडखाणीच्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचा दुजोरा प्रशासनाकडून देण्यात आला.
स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ओडापाडा तहसीलदार मोटांगा पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले होते. खबरदारी म्हणून खाणीभोवती हालचालींवर बंदी घालण्यात आली होती. मोटांगा पोलीस स्टेशनच्या प्रभारी निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी रात्रभर घटनास्थळी तळ ठोकून परिस्थितीचा आढावा घेत होते. उपलब्ध माहितीनुसार, खाणीत फक्त दोनच लोक होते आणि दोन मृतदेह सापडले आहेत. एक मृत बालासोरचा रहिवासी होता आणि दुसरा केओंझार किंवा मयूरभंजचा रहिवासी होता. दोघांचीही ओळख पटवली जात असल्याचे ढेंकनालचे जिल्हाधिकारी आशिष पाटील यांनी रविवारी सांगितले.
परवानगीशिवाय ब्लास्टिंग
दुर्घटना घडलेल्या खाणीत ब्लास्टिंगचा कोणताही वैध परवाना नव्हता, असे प्राथमिक तपासात दिसून आले. जिल्हा खाण कार्यालयाने 8 सप्टेंबर 2025 रोजी भाडेपट्टेदाराला नोटीस बजावत ब्लास्टिंग परवानगी नसल्यामुळे खाण बंद करण्याचे निर्देश दिले होते. असे असूनही, ब्लास्टिंगचे काम सुरूच राहिल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. स्फोटानंतर खाणीतील मातीचा एक भाग कोसळला होता. स्फोटाच्या वेळी खाणीत उपस्थित असलेले काही अन्य कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असतील असे मानून बचाव आणि शोधमोहीम सुरू ठेवली होती.