प्रथमेशच्या आत्महत्येप्रकरणी दोघा महिला कॉन्स्टेबलना अटक
दोघीही पर्वरीतील, आगशी पोलिसात कार्यरत
पणजी : वास्को रेल्वे पोलिसस्थानकाशी संलग्न असलेल्या अवघ्या 22 वर्षांच्या कॉन्स्टेबलास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आगशी पोलिसस्थानकातील दोन महिला पोलिसांना अटक करण्यात आली आहे. प्रीती बापू चव्हाण (23 वर्षे, पर्वरी) आणि तनीक्षा अशोक चव्हाण (21, पर्वरी) अशी या अटक करण्यात आलेल्या महिला पोलिसांची नावे आहेत. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याने झुवारी पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करुन दोन महिला कॉन्स्टेबल व त्यांच्या भावाने चालवलेल्या मानसिक सतावणुकीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. याप्रकरणी तरुण भारतने वृत्तही प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेद्वारे गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर वास्को पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली. व्हिडिओमध्ये ज्या नावांचा उल्लेख प्रथमेश याने केला होता होत, त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करुन काल सोमवारी रात्री दोघानांही अटक करण्यात आली.