अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा पंचगंगेत बुडून मृत्यू
पुलाची शिरोली/वार्ताहर
पुलाची शिरोलीतील दोघांचा पंचगंगा नदीत बुडून म्रूत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. विजय आकाराम माळी व संतोष शामराव नाळे अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळ व शिरोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विजय माळी हा प्लम्बिंगचे काम करत होता. शुक्रवारी माळी व नाळे हे दोघेजण दिवसभर बाहेर होते. ते घरी न आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मित्रांना माहिती दिली. त्यामुळे शनिवारी सकाळ पासून त्यांचा शोध सुरू झाला. दरम्यान पंचगंगा नदीवरील वळीकडे धरणाजवळ मासेमारीसाठी गेलेल्या लोकांना नदीशेजारी कपडे, मोबाईल फोन , चपला निदर्शनास आल्या. त्यांनी वळीवडे गावातील पोलीस पाटील यांना याची माहिती दिली. त्यानंतर गांधीनगर व शिरोली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून जीवरक्षक ( पाणबुडी )जवानांना संपर्क साधून मृतदेह शोधण्यासाठी संपर्क साधला आहे. पण पाणबुडे उपलब्ध झालेले नाहीत.
ही माहिती शिरोलीतील कांही तरुणांना समजली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन कपडे व मोबाईल फोन बघून माळी व नाळे यांचीच असल्याची खात्री झाली. त्यानंतर वळीवडे व शिरोली गावातील तरुणांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. माळी व नाळे हे मद्यप्राशन करून आंघोळीसाठी पाण्यात गेले असता ते बुडाले असावेत असा अंदाज पोलीस व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.