दुचाकी चोरी ; दोन अल्पवयीनसह तरुण अटक
कोल्हापूर :
दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीनसह एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. स्वप्निल सुनिल नलावडे (वय 19, रा. शाहुनगर, हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. या तिघाकडून 3 लाख 40 हजार रुपये किंमतीची दोन बुलेट आणि दोन स्प्लेंडर अशा चार दुचाकी जप्त केल्या. या तिघांनी या सर्व दुचाकी इचलकरंजी शहरातून चोरल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार महेश पाटील आणि महेश खोत यांना दोन अल्पवयीन तरुण चोरीची बुलेट घेऊन, कोल्हापूर- सांगली रस्त्यावरील अतिग्रे गावानजीक असलेल्या बीअर बार जवळ येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यावऊन त्या ठिकाणी सापळा रचून दोन अल्पवयीन तरुणाना ताब्यात घेऊन, त्याच्याकडून चोरी एक बुलेट जप्त केली. त्याच्याकडे कसून चौकशी सुरु केली. चौकशीमध्ये या दोघांनी संशयीत स्वप्नील नलावडे याच्या मदतीने आणखीन तीन दुचाकीची चोरी केल्याची माहिती दिली. त्यावरुन संशयीत नलावडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून एक बुलेट आणि दोन स्प्लेंडर अशा तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या तिघांनी चार दुचाकी इचलकरंजीतील गावभाग, शिवाजीनगर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक आणि शहापूर पोलीस ठाण्यात हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.