मार्चमध्ये दुचाकी वाहन विक्री जोमात
बजाज वगळता सर्व कंपन्यांची कामगिरी उत्तम
वृत्तसंस्था/ मुंबई
दुचाकी वाहन क्षेत्रामध्ये मार्चमध्ये विक्रीत चांगला उत्साह पाहायला मिळाला. विविध दुचाकी कंपन्यांनी आर्थिक वर्षामध्ये दोन अंकी विकास साधला आहे. मागच्या वर्षाच्या मार्चच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये रॉयल एनफिल्ड, टीव्हीएस मोटर, सुझुकी मोटरसायकल आणि हिरो मोटोकॉर्प यासारख्या कंपन्यांनी देशांतर्गत दुचाकी विक्रीत चांगली वाढ नोंदवली आहे.
बजाजची कामगिरी यथातथाच
याविरुद्ध मात्र मार्च महिन्यात बजाज ऑटोचे प्रदर्शन मात्र म्हणावे तितके उत्साहवर्धक राहिले नव्हते. आर्थिक वर्ष 2024 ते आर्थिक वर्ष 2025 पर्यंत एकंदर दुचाकींची विक्री दमदार अशी नोंदली गेली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये टीव्हीएस, सुझुकी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, हिरो, बजाज आणि रॉयल एनफिल्ड यासारख्या कंपन्यांची एकंदर दुचाकी विक्री 2 कोटी 29 हजार 530 इतकी झाली होती. आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेमध्ये पाहता विक्रीत 7.27 टक्के वृद्धी दिसून आली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1 कोटी 86 लाख 71 हजार 443 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. आर्थिक वर्ष 2024 मध्ये टीव्हीएसने 38 लाख 51 हजार गाड्यांची विक्री केली होती आणि 2024 आर्थिक वर्षांमध्ये 43 लाख 30000 वाहनांची विक्री केलीय. सुझुकी, होंडा मोटरसायकल, हिरो, बजाज आणि रॉयल एनफिल्ड यांनीही आपल्या वाहन विक्रीमध्ये वृद्धी नोंदवली आहे.
रॉयलची रॉयल कामगिरी
रॉयल एनफिल्डच्या दुचाकी विक्रीमध्ये देशातील विक्री जवळपास 33 टक्के वाढीव पाहायला मिळाली आहे. यावर्षी मार्चमध्ये 88 हजार 50 गाड्यांची विक्री करण्यामध्ये कंपनीने यश मिळवले आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यात 66 हजार 44 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती. एवढंच नाही तर रॉयल एनफिल्डच्या निर्यातीत 36 टक्क्यांची दमदार वाढ पाहायला मिळाली आहे. 12971 गाड्यांची कंपनीने मार्चमध्ये निर्यात केली आहे. मागच्या वर्षी ही निर्यात 9507 गाड्यांची होती. कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सेवेचा विस्तार करत आहे, ज्याचा फायदा कंपनीला होत आहे.
फेब्रुवारीपर्यंत 1 कोटी 79 लाखावर विक्री
सीयाम (एसआयएएम)संघटनेच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान 1 कोटी 64 लाख 86,786 दुचाकींची विक्री झाली होती, जी आर्थिक वर्ष 2025 मध्ये 8.9 टक्के वाढीसह 1 कोटी 79,50,393 इतकी झाली होती. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पाहता दर महिन्याला सरासरी 16.3 लाख दुचाकींची विक्री झालेली पाहायला मिळाली आहे. या आधारे पाहता आर्थिक वर्षा अखेरपर्यंत दुचाकींची विक्री 1 कोटी 96 लाख दुजाकींची विक्री होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेमध्ये पाहता वाढ 18 टक्के इतकी दमदार दिसणार आहे.