Kolhapur News : निपाणी-मुरगूड मार्गावर दुचाकी ट्रॅक्टरला धडक, तरुण ठार
निपाणी येथे दुचाकी अपघात, मित्र गंभीर जखमी
निपाणी : निपाणी-मुरगूड मार्गावर हॉटेल आस्वाद समोर चाललेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसल्याने अर्जुनी ता. कागल येथील तरुण जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. प्रकाश सदाशिव मिसाळ (वय २६) असे मृताचे तर ओंकार बाळासो चौगुले (रा. अर्जुनी ता. कागल) ही घटना रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, प्रकाश मिसाळ व ओंकार चौगुले हे दुचाकीवरून निपाणी होऊन मुरगूड रोडच्या दिशेने अर्जुनीला जात होते. दरम्यान,
हॉटेल आस्वाद हॉटेलनजीक आल्यानंतर प्रकाश मिसाळ याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरुन जाणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. त्यात प्रकाश मिसाळ हा जागीच ठार झाला तर ओमकार चौगुले गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व त्यांच्या सहकाऱ्यांने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर प्रकाश मिसाळ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला. ओंकार चौगुले याला निपाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रकाश मिसाळ याचा मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रकाश याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, भाऊजी असा परिवार आहे. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.