Accident News: ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना अपघात, दुचाकी घसरून चालक ठार
अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असून दुसरा इसम किरकोळ जखमी झाला आहे
कराड : पुणे-बेंगळूर महामार्गावर नांदलापूर (ता. कराड) येथील पुलाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असून दुसरा इसम किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना 30 जुलै रोजी दुपारी 2.20 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ बाळासो पवार (वय 50, रा. कासेगाव, जि. सांगली) हे होंडा शाईन दुचाकी चालवत होते. त्यांच्या पाठीमागे अक्षय दिलीप मिसाळ (वय 25, रा. कासेगाव) बसले होते. कराडकडे जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॉलीच्या मागील उजव्या बाजूस त्यांच्या दुचाकीची धडक झाली.
अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. ट्रॅक्टर चालक मंजुनाथ कांबळे (वय 40, रा. नांदलापूर) यांनी त्वरित ट्रॅक्टर बाजूला लावून घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली व जखमी दोघांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान विश्वनाथ पवार यांचा मृत्यू झाला, अपघाताची माहिती जखमी अक्षयने दिली असून, ट्रॉलीला ओव्हरटेक करताना धडक लागून अपघात झाल्याचे त्याने सांगितले. अपघाताची खबर ट्रॅक्टर चालक मंजुनाथ कांबळे यांनी दिली असून, त्यांनी मृत दुचाकी चालक विश्वनाथ पवार यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची तक्रार दाखल केली आहे.