‘वन वे’तून होतेय दुहेरी वाहतूक
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, वाहनचालकांचाही मनमानीपणा
बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांचे सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहनचालक वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने वाहने हाकत आहेत. पण याचे पोलिसांना कोणत्याही प्रकारचे देणे-घेणे नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषकरून किर्लोस्कर रोड आणि रामदेव गल्ली ‘वन वे’ असतानाही वाहनचालक दोन्ही बाजूने ये-जा करीत आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासह शहर अमलीपदार्थ मुक्त बनविण्याचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले होते. यापूर्वी वाहतूक पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ठिकठिकाणी थांबून दंडात्मक कारवाई करत होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांना दंड वसुलीचे टार्गेट देत होते. त्यामुळे दिवसाचे दंड वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पोलीस मोक्याच्या ठिकाणी थांबून दंडात्मक कारवाई करत होते. दररोज वाहतूक पोलिसांकडून अडवणूक होण्याचे प्रमाण वाढल्याने वाहनचालक वैतागले होते.
त्यातच वाहतूक नियमन कक्षातून (टीएमसी) नोटिसादेखील धाडल्या जात होत्या. पण बहुतांश पोलीस दंड वसुलीतच व्यस्त असल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई न करता सीसीटीव्ही किंवा मोबाईलच्या माध्यमातून संबंधितांच्या वाहनाचे नंबर टीपून त्यांना दंडाची नोटीस पाठविण्यात यावी व वाहतूक पोलिसांनी यापुढे केवळ वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी असे निर्देश दिले आहेत. तेव्हापासून पोलिसांनी स्पॉट फाईन घालणे बंद केले आहे. मात्र शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारलेली नाही. बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात आहेत. शहरात किर्लोस्कर रोड आणि रामदेव गल्लीत एकेरी वाहतूक व्यवस्था आहे. मात्र या मार्गावरून दोन्ही बाजूने वाहने हाकली जात आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असले तरी पोलिसांकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यातच रामदेव गल्लीत गटारीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. आधीच अरुंद असलेल्या गल्लीत काम सुरू असल्याने दुहेरी वाहतुकीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकेरी रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.