Guhagar Beach | गुहागरच्या समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान; वॉटर स्पोर्ट्स कर्मचाऱ्यांची तत्परता!
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा जीव टांगणीला
गुहागर (सत्यवान घाडे) -गुहागर समुद्रकिनाऱ्यावर समुद्र स्नानाचा आनंद घेताना खोल समुद्रात गेल्याने साताऱ्यातील दोन तरुण बुडत होते. समर्थ वॉटर स्पोर्टच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे या दोघांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. निविदा संपल्याने गुहागर समुद्रावर नियुक्त केलेले जीव रक्षक सध्या उपलब्ध नाहीत. यामुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगरपंचायतीने चालक म्हणून कामावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला समुद्रकिनाऱ्यावर तात्पुरती जीवरक्षकाची नियुक्ती दिली आहे.
गुहागर शहरात पर्यटकांचा ओढा वाढत आहे शालेय सुट्टी पडल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर गुहागर समुद्रावर तसेच येथील विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी हजेरी लावत आहेत अशा मध्येच समुद्र स्नानाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना योग्य ती सूचना देण्यासाठी व वेळ पडल्यास त्यांना वाचवण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने पाच जीव रक्षकांची नियुक्ती केली होती या जीव रक्षकांचे संपर्क नंबर या सहा किलोमीटरच्या परिसरात ठीक ठिकाणी लावले आहेत मात्र या जीव रक्षकांचे नियुक्तीचे टेंडर संपल्याने तुम्ही नवीन टेंडर झाल्यावर हजर व्हावे असं सांगून गुहागर समुद्र चौपाटीवरील सुरक्षा अधांतरी ठेवली आहे.
नगरपंचायतीमध्ये बहुतांशी वेळेला गाडीवर चालक म्हणून असलेले आशिष सांगळे या एकट्यांवर 6 किलोमीटरच्या या समुद्रकिनाऱ्याची सुरक्षेची जबाबदारी दिली आहे. सध्या ते वरचापाट दुर्गादेवी येथील परिसरात सुरक्षेचे काम करत आहेत. आज सकाळी 8.30 ते 8.45 वाजता च्या दरम्यान खालचापाट येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील समुद्र चौपाटीवर साताऱ्यातील सिद्धांत पाटील व शुभांकर हे दोन पर्यटक समुद्र स्नानाचा आनंद घेत होते. समुद्र स्नानाचा आनंद घेताना खोल समुद्रात जाण्याचा मोह आवरता येत नाही त्याचप्रमाणे त्यांनाही खोल समुद्रामध्ये जाण्याचा मोह आवरला नाही आणि पाण्यामध्येच ते गटांगळ्या खाऊ लागले. किनाऱ्यावर असलेल्या त्याच्या मित्राने सध्या नियुक्ती नसल्याने रजेवर असलेल्या पाच जीवरक्षकांपैकी जीव रक्षक परदेश तांडेल यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परदेश तांडेल यांनी ते बाहेर असतानाही तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील समर्थ वॉटर स्पोर्ट चे मालक व नगरसेवक, गटनेते उमेश भोसले यांच्याजवळ संपर्क साधला. नगरसेवक उमेश भोसले यांनी आपल्या समर्थ चे कर्मचारी मुजाहिद मिरकर व सफायद बागकर यांना आपली जेट्सकी घेऊन त्या ठिकाणी पाठवले.
या दोघांच्या चालाखीमुळे पाण्यामध्ये बुडत असलेल्या या दोघांनाही सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी नगरपंचायतीने तात्पुरते नियुक्त केलेले जीव रक्षक आशिष सांगळे यांनीही घटनास्थळी पोहोचून पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.
दरम्यान ऐन पर्यटकांच्या हंगामावेळी गुहागर नगरपंचायतीला जीव रक्षकांची नियुक्ती नियमित ठेवण्यास अपयश आल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीवर नवीन कमिटी ही नियुक्ती झाली असताना अशा महत्त्वाच्या व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना करण्यामध्ये ही नवीन कमिटी ही अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहेत. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर लवकरात लवकर जीव रक्षकांची नियुक्ती व्हावी अशी मागणी पर्यटक त्याचबरोबर गुहागर शहरवासीय करत आहेत.