द्विस्तरीय कसोटी व्यवस्था ही वाईट कल्पना : क्लाईव्ह लॉईड
वृत्तसंस्था/ गयाना (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी मोठ्या तीन राष्ट्रांदरम्यान अधिक मालिका खेळविण्याच्या दृष्टीने द्विस्तरीय कसोटी व्यवस्था आणणे ही वाईट कल्पना असल्याचे आणि वेस्ट इंडिज व अन्य ज्या देशांनी कसोटी दर्जा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेले आहेत त्यांच्यासाठी ते अत्यंत हानिकारक ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट मंडळांच्या सहकार्याने या तीन राष्ट्रांदरम्यान अधिक मालिका खेळविण्याच्या दृष्टीने द्विस्तरीय कसोटी प्रणाली अस्तित्वात आणण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. मला वाटते की, ज्या देशांनी कसोटी सामन्याचा दर्जा मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि ज्यांना आता कनिष्ठ विभागात आपसात खेळावे लागेल त्यांच्यासाठी हे भयानक असेल, असे ‘त्रिनिदाद अँड टोबॅगो गार्डियन’ला प्रतिक्रिया देताना लॉईड यांनी म्हटले आहे.
आयसीसीचे माजी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी वेस्ट इंडिजचे विघटन करून वैयक्तिक देश म्हणून त्यांनी खेळावे अशी सूचना केलेली असून त्यावर नाराजी व्यक्त करताना लाईड म्हणाले, ‘आमचा इतिहास जबरदस्त राहिलेला आहे आणि आता तुम्ही आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला विखुरले पाहिजे असे सांगत आहात’. इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिलेल्या लॉईड यांनी आघाडीचे तीन संघ आणि उर्वरित संघ यांच्यातील कामगिरीत जो फरक दिसतो त्याचे खापर आयसीसीद्वारे निधीच्या असमान वितरणावर फोडले आहे.
ते वेस्ट इंडिजचे विघटन करण्याबद्दल बोलत आहेत, हा पुढे जाण्याचा मार्ग नाही. वेस्ट इंडिज आणि इतर संघांना समान रक्कम द्यायला हवी, म्हणजे ते त्यांच्या सुविधा सुधारू शकतील, अधिक चांगल्या व्यवस्था निर्माण करू शकतील, जेणेकरून ते त्यांचा क्रिकेट खेळ सुधारू शकतील, असे मत 80 वर्षांच्या लाईड यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी जागतिक कसोटी स्पर्धेच्या रचनेवरही टीका करताना ती व्यवस्थित आयोजित केली जात नाही, असे म्हटले आहे.