कुलगाममध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
संघर्षात चार सुरक्षा कर्मचारी जखमी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दुपारपर्यंत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या परिसरात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय होता. या संघर्षात लष्कराचे 3 जवान आणि कुलगामचे एएसपी जखमी झाले आहेत. चौघांनाही उपचारासाठी श्रीनगरला हलवण्यात आले आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे एन्काउंटरची माहिती दिली. पोलीस आणि लष्कराने संयुक्त मोहिमेअंतर्गत आदिगाममध्ये शोधमोहीम सुरू केल्याचे सांगितले. याचदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करताच चकमक सुरू झाली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत चकमक सुरूच होती. कुलगाम चकमकीत जखमी झालेल्या सुरक्षा जवानांना उपचारासाठी श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एएसपी मुमताज अली भाटी, कॉन्स्टेबल सोहन कुमार, कॉन्स्टेबल योगिंदर आणि मोहम्मद इस्रान यांचा समावेश आहे.