दोन दहशतवाद्यांना बारामुल्लात कंठस्नान
वृत्तसंस्था / बारामुल्ला
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात भारतीय सैनिकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गुरुवारी रात्रीपासून ही चकमक सुरु होती. शुक्रवारी पहाटे सैनिकांनी दहशतवाद्यांची पुरती कोंडी करुन त्यांना संपविले, अशी माहिती देण्यात आली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक स्थानिक तर एक विदेशी होता.
बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर क्षेत्रात दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचरांनी दिल्यानंतर सैनिकांनी या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी अभियान हाती घेतले. वनविभागाला चारी बाजूंनी वेढा घालण्यात आला. त्यानंतर काही सैनिकांनी वनप्रदेशात जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेतला. दहशतवादी लपलेली जागा सापडल्यानंतर त्यांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. तथापि, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सैनिकांनीही गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.
पोलिसांचाही सहभाग
भारतीय सुरक्षा दलांच्या सैनिकांप्रमाणेच जम्मू-काश्मीरच्या पोलिसांचाही या अभियानात सहभाग होता. सैनिक आणि पोलीस यांची ही संयुक्त कारवाई होती. जवळपास सहा तास चकमक चालली होती. लपलेल्या दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असल्याची माहिती होती. त्यांच्यापैकी दोघांचा खात्मा करण्यात आला. आणखी दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. मात्र, चकमक आता थांबली आहे.
शस्त्रसाठा जप्त
दहशतवादी लपलेल्या जागातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बंदुका, एके 47 रायफल्स तसेच काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रक्षोभक लिखाण असणारे काही कागद जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी असल्याची माहिती देण्यात आली असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. गेल्या आठवडाभरातील ही तिसरी मोठी चकमक असून या कालावधीत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.