‘त्या’ प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती
मंडोळी रोडवरील तरुणाचे अपहरण की घातपात कारण गुलदस्त्यात
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
मंडोळी रोड वाटवे कॉलनी येथून एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याचे कारगाडीतून अपहरण करण्यात आल्याने पोलीस खात्याची झोप उडाली आहे. सर्वेश अभिजीत कंग्राळकर रा. मारुतीनगर, तिसरा क्रॉस, सांबरा रोड असे त्याचे नाव असून याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. सदर तरुणाचा घातपात झाला आहे की अपहरण करण्यात आले आहे, याचा सुगावा लागू शकला नसून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रकरणी वडील अभिजीत प्रभाकर कंग्राळकर यांनी सोमवार दि. 21 रोजी माळमारुती पोलीस स्थानकात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. रविवार दि. 20 रोजी सर्वेश घरी असताना सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्याला एक फोन आला. त्यानंतर तो केए 22 एचवाय 0194 ही स्कूटी घेऊन गणपती पाहण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला. गणपती पाहण्यासाठी गेलेला मुलगा मध्यरात्री घरी परतेल या समजुतीने कुटुंबीय झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतदेखील सर्वेश घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. ज्या दिवशी सर्वेश घरातून बाहेर गेला त्याच रात्री मंडोळी रोडवरील वाटवे कॉलनी येथून काही जणांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत कारगाडीत कोंबून त्याचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. त्यावेळी तेथील घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र सर्वेशचे अपहरण कोणत्या कारणासाठी व कोणी केले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. केवळ त्याचे अपहरण करण्यात आले आहे की घातपात या दिशेनेही चौकशी सुरू आहे.
सर्वेशने यापूर्वी दोघांवर हल्ला केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याचेही बोलले जात आहे. ज्यांच्यावर संशय आहे ते देखील फरारी आहेत. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत. ज्या दिशेने कार रवाना झाली आहे त्या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कार बेळगावातून महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्राकडून समजली असून दोन विशेष पथके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
योग्य दिशेने तपास सुरू
मंडोळी रोड, वाटवे कॉलनी येथे घडलेल्या घटनेचा तपास करण्यासाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम हाती घेण्यात आले असून तपास योग्य दिशेने सुरू आहे. स्वत: पोलीस निरीक्षक जातीने लक्ष घालून तपास करीत आहेत.
- प्रकाश निकम, पोलीस आयुक्त