लाचप्रकरणी दोन संशयिताचे आत्मसमर्पण
सातारा :
संपूर्ण जिह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन संशयित आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी ता. माण), सहायक फौजदार किशोर संभाजी खरात (रा. बी.डी.डी चाळ वरळी) यांनी सातारा जिल्हा कोर्टापुढे आत्मसमर्पण केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्हा न्यायालयातील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम, आनंद खरात, किशोर खरात व अनोळखी एकाविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणातील तक्रार युवतीचे वडील न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत. युवतीने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर त्याची सुनावणी न्या. धनंजय निकम यांच्याकडे सुरु होती.
जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो असे सांगून आनंद खरात, किशोर खरात हे युवतीला भेटले. मात्र त्यासाठी 5 लाख रुपये प्रोटोकॉल म्हणून द्यावे लागतील, असे संशयितांनी सांगितले. लाचेची मागणी झाल्याने युवतीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार केली. गेल्या दहा दिवसात पुणे एसीबीने याप्रकरणी पडताळणी केली असता त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच सुरुवातीला न्या. धनंजय निकम हे युवतीला भेटले असल्याचेही युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अखेर पुणे एसीबीने दहा दिवसातील घडलेल्या सर्व घटनेची माहिती एकत्र करुन सातारा शहर पोलीस ठाण्यात न्यायाधीशासह चौघांवर लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस उलटल्यानंतरही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील दोन संशयित आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात यांनी सोमवारी सातारा जिल्हा कोर्टापुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर कोर्टाने त्यांना 30 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
लाच प्रकरणी आत्मसमर्पण केलेले आनंद मोहन खरात, किशोर संभाजी खरात यांना सातारा कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज दि. 17 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे अधिकारी त्यांना ताब्यात आहेत.