आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित दोन संशयितांना अटक
थायलंड ते गोवा ड्रग्ज कनेक्शन
प्रतिनिधी/ पणजी
गोवा पोलिसांनी 8 मार्च रोजी गिरी-म्हापसा येथे जप्त केलेल्या सर्वात मोठ्या ड्रग्जच्या तपासकामादरम्यान थायलंड ते गोवा कनेक्शन असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असलेल्या आणखी दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी संशयितांचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अटक केलेल्या संशयितांमध्ये शिलन ए. (12 मार्च रोजी बेंगळूर येथून अटक) श्रीजील पी. (19 मार्च रोजी केरळ येथून अटक) यांचा समावेश आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने 8 मार्च रोजी केलेल्या कारवाईत 11 कोटी 67 लाख ऊपये किंमतीचा ‘हायड्रोफॉनिक विड’ हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला होता. यावेळी संशयित आरोपी गौतम (27, रा. बेंगळूर-कर्नाटक) याला अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, गौतम याची सखोल चौकशी केली असता पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टींबाबत माहिती मिळाली. गौतमकडे त्याच्या तस्लीम नावाच्या मित्राने संपर्क साधत त्याला बँकॉकमधून भारतात ड्रग्ज तस्करीची ऑफर दिली होती. यासाठी सुमारे एक लाख इतके कमिशन ठरविण्यात आले होते. गौतमने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शिलना ए. या महिलेला ताब्यात घेत ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली बेंगळूरमधून अटक करण्यात आली. ती बँकॉकमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडीकेटची प्रमुख सदस्य असल्याचे देखील धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत.
प्रकरणाचा अधिक तपास करताना कन्नूर-केरळ येथील श्रीजील पी. हा या सिंडीकेटचा आर्थिक कणा असल्याचे आढळून आले. त्यानेच गौतम आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांची बँकॉक ते भारत विमानाची तिकिटे आरक्षित केली होती. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक किशोर रामानन यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने 19 मार्च रोजी कन्नूर येथून श्रीजील पी. याला अटक केली.
दरम्यान, बँकॉक येथून आलेले ड्रग्स हे गोव्यात विकले जाणार होते. दरम्यान या सर्वांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे थायलंड आणि इतर भागांत राहून व्यवहार करणाऱ्या सिंडीकेटच्या सदस्यांच्याबाबत माहिती काढण्यात आली आहे. कायदेशीररित्या या सदस्यांविऊद्ध लूक-आऊट सर्क्युलर (एलओसे) आणि ब्लू नोटीसही जारी करण्यात आली आहे. सर्व आरोपी सध्या कोठडीत आहेत. पुढील तपास पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे पोलिस करीत आहेत.
थायलंडहून नेपाळमार्गे गोव्यात पोहोचला गांजा
हायड्रोफॉनिक विड हा उच्च दर्जाचा गांजा थायलंडहून विमानमार्गे नेपाळला आणला गेला होता. नेपाळहून नंतर हा गांजा गोव्यात आणला गेला. संशयित आरोपी गौतम याने या गांजाच्या तस्करीमध्ये डिलिव्हरी बॉयची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे हा गांजा गोव्यात कोणत्या ड्रग्ज पॅडलरने मागवला होता, याचा तपास गुन्हा शाखेचे पोलिस घेत होते.