दोन संशयितांना कलबुर्गीत अटक
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोप : उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
बेंगळूर : पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कलबुर्गी जिल्ह्यातील दोन संशयितांना अटक केली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएसने ही कारवाई केली. अटकेतील आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. मोहम्मद समीर आणि सलमान अशी संशयितांची नावे असून, समीर हा उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने कलबुर्गी तालुक्यातील मालगत्ती आणि उपळाव गावांच्या परिसरातून अटक केली.
ते दोघेही मांस (बीफ) निर्यात करणाऱ्या ‘फेअर एक्सपोर्ट्स’ कारखान्यात काम करत होते, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. आरोपी व्हॉट्सअॅप कॉल आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. एटीएस पथकाच्या छाप्यादरम्यान आरोपी समीर राहत असलेल्या खोलीत काही नकाशे सापडले. सध्या कलबुर्गीतील एका अज्ञात ठिकाणी एटीएसकडून दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. कलबुर्गी येथील विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कसे सापडले?
आंतरराज्यीय सोशल मीडिया पाळत ठेवत असताना हे प्रकरण उघडकीस आले. गेल्या काही दिवसांपासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या सोशल मीडिया खात्यांवर सातत्याने पाळत ठेवली जात होती. समीर हा पाकिस्तानी व्यक्तींद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका फेसबुक पेज आणि इतर देशविरोधी वेबसाईट्सच्या सतत संपर्कात होता. या आधारावर, कलबुर्गी पोलीस आणि उत्तर प्रदेश एटीएस पथकाने संयुक्तपणे छापा टाकून आरोपीला अटक केली. सध्या, एटीएस अधिकारी समीरची चौकशी करत असून, तो कोणत्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होता आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोण आहे, याबद्दल माहिती गोळा करत आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.