तळवडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
न्हावेली /वार्ताहर
गुरुवर्य बी.एस.नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या इयत्ता सातवीतील पियुष संजय परब तसेच आठवीतील गणेश विशाल परब या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन मार्फत आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या दोघांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.भारत क्लब ॲकडमी सावंतवाडी येथे आयोजित या स्पर्धेत प्रशालेच्या इयत्ता सातवीतील पियुष संजय परब तसेच इयत्ता आठवीतील गणेश विशाल परब या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.या खेळाडूंना थेट राज्य मानांकन स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना कॅरम प्रशिक्षक म्हणून अश्फाक शेख यांचे मार्गदर्शन लाभले.या नेत्रदीपक यशाबद्दल प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक,मुख्याध्यापक अजय बांदेकर,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,सहाय्यक,शिक्षक,तसेच शिक्षकेतर,कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.