दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 19 प्रवासी जखमी
बांदा दोडामार्ग मार्गावरील घटना ;अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी
मयुर चराटकर
बांदा
बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. फुकेरी बांदा बस (एम एच २०बीएल २९५७) फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या धाराशिव पणजी बसची (एम एच १४एलबी ०७४९) समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात फुकेरी बसला फरफटत नेले. फुकेरी बस मधील प्रवाशाना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. चालक वाहक मिळून एकोणीस जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमीना डोक्याला दुखापत झाल्याने सावंतवाडी येथे सिटी स्कॅन साठी पाठविले. तर काहींना बांदा येथेच उपचार सुरु आहेत. एसटी बस च्या दोन्ही चालक व वाहकांना किरकोळ दुखापत झाली असुन त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरु आहेत. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असुन उपचार घेत असणाऱ्या जखमीची त्यांच्या कडुन विचारपूस करण्यात आली. तर तात्काळ त्यांना आर्थिक मदत करणार असे सांगण्यात आले. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर रस्ता बंद झाल्याने काही एसटी फेऱ्या उशिरा गेल्याने प्रवाशाचे हाल झाले. आज सोमवार आठवडा बाजार असल्याने त्याचा सर्वात जास्त फटका बाजारात येणाऱ्यांना बसला आहे. घटनास्थळी बांदा पोलीस हजर झाले असुन पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.