मोखर्ड-काणकोण येथे दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू; दोघींच्या मृत्यूचे गूढ शवचिकित्सा अहवालानंतर उकलणार
काणकोण : मोखर्ड, काणकोण येथील आपल्या मूळ घरात राहत असलेल्या दोन वयोवृद्ध बहिणींना संशयास्पद स्थितीत मृत्यू आला असून त्यांचे मृतदेह काणकोणच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी मडगावला पाठविले आहेत. या घटनेने काणकोणात खळबळ माजली असून मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही, त्यांनी आत्महत्या केली की अन्य कुणीतरी त्यांचा मृत्यू घडवून आणला? याचे गूढ शवचिकित्सा अहवालानंतरच उकलणार आहे.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बहिणींपैकी एकीचे नाव रेखा वैकुंठ कामत (७३ वर्षे), तर दुसरीचे मेधा वैकुंठ कामत (७० वर्षे) असे आहे. दोघीही अविवाहित होत्या आणि त्या दोघीच घरात राहत होत्या. दोघींनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा संशय वाड्यावरील चर्चेतून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या मृत्यूचे कारण समजलेले नसून घरातून काही तरी कुजल्याची दुर्गंधी येऊ लागल्यानंतर वाड्यावरील लोकांनी काणकोणच्या पोलिसांना याची खबर दिली. त्यावेळी काणकोणच्या पोलिसांनी घराचे दार उघडल्यानंतर मृतावस्थेतील दोन्ही बहिणी आढळल्या. दोन्ही बहिणींनी कंटाळून आरोग्याला अपायकारक असे काही तरी प्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी वाड्यावरील सर्व लोक गणेशचतुर्थी सण साजरा करण्यात मग्न असताना ही गोष्ट घडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दोन्ही बहिणींचा वाड्यावरील लोकांशी संबंध नव्हता. मात्र वाड्यावर अथवा मंदिर किवा सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांना त्या उपस्थित राहत असत, अशी माहिती मिळाली आहे. काणकोणचे पोलिस निरीक्षक तेहरान डिकॉस्ता यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि शवचिकित्सेसाठी कुजलेल्या अवस्थेतील दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, मयत बहिणींचा एक भाऊ कुंकळ्ळी येथे, तर एक भाऊ परदेशात नोकरीनिमित्त आहे. काणकोणचे उपनिरीक्षक रामदास डोईफोडे पुढील तपास करत आहेत.