For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव न्यू मार्केटमधील दोन दुकाने जळून खाक

06:34 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मडगाव न्यू मार्केटमधील दोन दुकाने जळून खाक
Advertisement

लाखेंची हानी : फायर हायड्रंटची गरज अधोरेखित

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/मडगाव :

मडगाव येथील न्यू मार्केटमधील दोन दुकानांना शनिवारी पहाटे 2.30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत ही दुकाने जळून खाक झाली असून त्यात लाखेंचे नुकसान झाले आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 2.30 वाजता न्यू मार्केटमधील दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा येत असल्याचे सोपो कर गोळा करणाऱ्या सनी नामक व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने तात्काळ इतर दुकानदारांना तसेच मडगाव अग्निशामक दलाला याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. छतावरील पत्रे काढूनही आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला, ज्यामुळे आग आजूबाजूच्या इतर दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

या आगीत दामोदर बोरकर यांचे ज्यूस शॉप व कासिम शेख यांचे टेलरिंग दुकान या दोन दुकानांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक चौकशीत ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने बाजारपेठेत गर्दी नव्हती, ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीत दोन्ही दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी सांगितले की, अग्निशामक दलाने वेळेत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. मार्केटमध्ये ‘फायर हायडंट’ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून त्यांची जोडणी लवकरच दिली जाईल. यामुळे भविष्यात आगीच्या घटना घडल्यास अधिक सुरक्षितता मिळेल, असेही त्यांनी नमूद केले

Advertisement
Tags :

.