लोंढा येथील मारामारीत दोघेजण गंभीर जखमी
पाच जणांवर गुन्हा दाखल : हिंडलगा कारागृहात रवानगी
खानापूर : तालुक्यातील लोंढा येथे रविवार दि. 5 रोजी सायंकाळी दोघा भावांवर पाच जणांनी अचानक हल्ला केल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला करणाऱ्या पाच जणावर गुन्हा दाखल करून त्यांना रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी लोंढा येथील चर्चगल्ली येथील रहिवासी असलेले रॉबिन जॉन्सन आरेकर आणि त्याचा भाऊ पिटर जॉन्सन आरेकर हे ईस्टरनिमित्त फटाके उडवत होते.
यावेळी लोंढा येथील जॉन्सन डिकोस्टा, विल्सन डिकोस्टा, नेल्सन डिकोस्टा, अझर कंझारी, विनोद भंडारी यांनी येऊन फटाके का उडवत आहेस, असे विचारले असता त्यांनी ईस्टर संडे असल्याने फटाके वाजवतात तुला माहीत नाही का, असे प्रत्युत्तर दिल्याने वरील पाच जणांनी रॉबिन आणि त्याचा भाऊ पिटर आरेकर याच्यावर लाथा बुक्क्यांनी तसेच दगड व विटांनी हल्ला केला. यात रॉबीन हा गंभीर जखमी झाला असून त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर त्याचा भाऊ पिटर आरेकर हासुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
खानापूर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सखोल चौकशी करून जॉन्सन डिकोस्टा, विल्सन डिकोस्टा, नेल्सन डिकोस्टा, अझर कंझारी, विनोद भंडारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भा. द. वी. 189 (2), 191 (2), 191 (3), 126 (2), 115 (2), 118 (1), 118 (2), 351 (3) आणि 352 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ
लोंढा येथील या हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त ठेवला असून पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. लोंढ्यात गेल्या काही वर्षांपासून काही लोक दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दहशतीखालीच गावात वातावरण भीतीदायक बनले होते. त्याचा परिणाम आज झालेल्या मारामारीतून समोर आला आहे. पोलिसांनी वेळीच दहशत माजविण्यावर आळा घातला असता तर ही मारामारी टळली असती अशी चर्चा नागरिकांतून होत होती.