अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी
कास प्रतिनिधी
सातारा जावळी तालुक्याच्या परळी बामणोली खोऱ्यात वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव सुरुच आहे. दरम्यान शनिवारी दुपारी जुंगटी येथून पिसाडी कारगावच्या दिशेने निघालेल्या संतोष कोकरे व शंकर जानकर यांच्यावर अचानक अस्वलाने जिवघेणा हल्ला केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहे.
शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारस पिसाडी येथील वयोवृद आत्याला पाहण्यासाठी निघालेल्या संतोष लक्ष्मण कोकरे रा. जुंगटी वय ४१ व त्याच्या सोबत असणारे शंकर जानकर रा . बांबर (केळवली ) वय ५३ यांच्यावर जुंगटी कात्रेवाडी रस्त्यावरील खिंडीच्या लिकडे जंगलातुन बाहेर आलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला. यामध्ये संतोष कोकरे यांच्या मानेला,कंबरेला व पायाला चावा घेतला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. शंकर जानकर यांच्या ही पायाला चावा घेतला असुन दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी अस्वलापासुन सुटका करून घेत जुंगटी येथे घरी परतले असता ग्रामस्थांनी दवाखान्यात नेण्यासाठी १०८ रुग्णावाहीकेशी सपर्क केला असता, उपलब्ध न होऊ शकल्याने अखेर सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ कास पठार वनसमितीचे वाहन पाठवुन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचना दिल्या असता कास पठार वनसमितीच्या वाहनातून त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात जाऊन माजी जि.प सदस्य राजु भैय्या भोसले यांनी रुग्णांची विचारपुस करत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे योग्य व तात्काळ उपचाराची मागणी केली. वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण अभिजीत माने वनपाल राजाराम काशीद आदींनी जाऊन रुग्णांची पाहणी केली. तर पुढील उपचारासाठी व शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे अश्वासन दिले आहे.
जुंगटी कात्रेवाडी कारगाव केळवली सांडवली आलवडी नावली देऊर आदी परिसरासह परळी खोऱ्यात वन्यप्राण्यांचा दिवसेंदिवस उच्छाद वाढला असुन शेतकऱ्यांना शेती करणे एका गावातुन दुसऱ्या गावात पायी चालत जाणे जिकिरीचे जिवघेणे ठरू लागले असुन कोणात्याही उपाययोजना होत नसल्याने माणसांना दिवसाही घराबाहेर पडणे अवघड बनले आहे.