अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी दोघा सिरियल किलरना जन्मठेप
पूर्वीच्या दोन खून प्रकरणीही जन्मठेपची शिक्षा
पणजी : एविता रॉड्रिगीस या 16 वर्षीय मुलीच्या खून प्रकरणी चंद्रकांत तलवार (रा. पणजी) आणि सायरन रॉड्रिग्ज (रा. मेरशी) यांना पणजी येथील बाल न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आली. यापूर्वी आणखी दोन महिलांच्या खून प्रकरणातही त्यांना जन्मठेप झाली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि विद्यमान अधीक्षक सुनीता सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी यशस्वीरीत्या या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. खुनाचे हे प्रकरण 2009 साली तिसवाडी तालुक्यात उघडकीस आले होते. करंझाळ येथील एविता रॉड्रिगीस या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह पोलिसांना वेर्णा येथे सापडला होता. या युवतीकडे असलेला मोबाईल आणि अन्य माहितीच्या आधारे गोवा पोलीस पथकाने 17 ऑक्टोबर 2009 रोजी मुंबईतून चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिग्ज यांना तसेच आणखी दोघा महिलांना अटक केली होती.
या प्रकरणी गुन्हे शाखेने बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील कृष्णा संझगिरी, मिलेना पिंटो यांनी आरोपीविऊद्ध भरभक्कम पुरावे सादर करून जोरदार युक्तिवाद केला. या दोन्ही आरोपींना याआधी डिचोली येथील शर्मिला मांद्रेकर (25) हिचे अपहरण आणि खून केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा मिळालेली आहे. तसेच वेर्णा येथील मासळी विक्रेती कोसेसांव डिसोझा आणि हळदोणा येथील एका अज्ञात महिलेचाही खून त्यांनी केला होता. वेर्णा येथून 2009 साली उत्तर प्रदेशातील मालती यादव हिच्या खून प्रकरणीही जन्मठेप प्राप्त झाली होती. मुंबई येथेही एका महिलेचा त्यांनी असाच खून केल्याचे नंतर उघडकीस आले होते. आधी केलेले दोन खून प्रकरणी जन्मठेप आणि वेर्णा येथे अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात सबळ पुरावे सापडल्याने या दोन्ही सिरियल किलरना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
हसत-खेळत खून करण्याची मोडस ऑपरेण्डी
या आरोपीकडे काळ्या काचेची गाडी होती. वाटेत एकट्याने चालणाऱ्या एकाद्या महिलेला पत्ता विचारण्याच्या निमित्ताने ते ओळख वाढवून त्यांना गाडीत बसवत असत. मग गाडीतच या महिलांना गळा दाबून ते खून करून त्यांना दुसऱ्या एकाद्या ठिकाणी फेकत असत. दहावीच्या वर्गात शिकत असलेली एविता रॉड्रिगीस ही दोघांच्या ओळखीची होती. तिच्या परीक्षेचे ठिकाण दाखवतो, म्हणून सांगून तिला गाडीतून नेण्यात आले होते. तिच्याबरोबर हसत-खेळत जेऊन करून त्यांनी तिचा गाडीतच निर्घृण खून करून दागिने, पैसे आणि मोबाईल काढून तिला वेर्णा पठारावर टाकून तिच्यावर पेट्रोल पेटवून देण्यात आले होते. याच दिवशी कोसेसांव डिसोझा या महिलेचाही खून त्यांनी करून पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले होते.